अकोला,दि.८– शासनाच्या महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पूनर्वसन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजेस बुधवार (दि.८) पासून आहे त्या क्षमतेच्या ३३ टक्के इतकेच सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
या संदर्भात कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अटी व शर्ती निर्धारीत केल्या आहेत.
त्या याप्रमाणे-
संबंधित सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉजेसच्या आस्थापना खाली नमूद मूलभूत व्यवस्था निश्चित करतील.
१) कोविड -१ च्या विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स / स्टँडिज / एव्ही मीडिया ( Posters /standees/AV media ) आणि ही मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे दर्शविण्यात यावी.
२) हॉटेलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करुन सार्वजनिक ठिकाणी पुन्हा बसण्याची व्यवस्था केली जाऊ शकेल.
३) प्रवेशव्दारावर येणाऱ्या व्यक्तींचे थर्मल स्क्रिनींग ची व्यवस्था करावी. स्वागत कक्षामधील रिसेप्शन टेबल व स्पेसमध्ये संरक्षक काच असावा.
४) अतिथींसाठी पेडल ऑपरेट डिस्पेंसरसह हँड सॅनिटायझर्स (पायाने हाताळण्यात येणारे यंत्र) उपलब्ध करण्यात यावे. तसेच रिसेप्शन, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी इत्यादी) हॅन्ड सॅनिटायझरची सेवा विनामूल्य उपलब्ध करणे आवश्यक आहे.
५) हॉटेल मध्ये येणाऱ्या अतिथिंना तसेच हॉटेल मधील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणाचे दृष्टीने फेस कव्हर्स व मास्क ग्लोव्ह इत्यादी उपलब्ध करुन देण्यात याव्यात .
६) हॉटेल चालकांनी अतिथींच्या ऑर्डर तसेच चेक-आऊट व चेक-इन या दोन्ही करिता क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, इ-वॉलेट इत्यादींसारख्या डीजीटल पेमेंट सारख्या कॉन्टॅक्टलेस प्रक्रिया अंगीकारल्या पाहीजेत.
७) लिफ्टमधील अतिथींची संख्या मर्यादीत असावी. आणि योग्यरित्या सामाजिक अंतराचे निकष पाळले जावेत.
८) वातानुकूलन व वेंटिलेशन सेन्ट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट (CPWD) च्या मार्गदर्शक तत्वानुसार केले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच तापमान २४-३०० सेंटीग्रेड असावे, सापेक्ष आर्द्रता ४०-७० % च्या श्रेणीत राहील याची दक्षता घ्यावी. मोकळ्या हवेचे प्रमाण शक्य तितके जास्त असले पाहिजे आणि पुरेसे वायुविजन असावे.
अतिथी/ ग्राहक
1) ज्या व्यक्तींना कोविड-१९ ची लक्षणे नाहीत अश्या व्यक्तींना प्रवेश द्यावा.
2) मास्क घालून व फेस कव्हर असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा मास्काचा वापर करणे बंधनकारक राहील.
3) हॉटेलमध्ये येणाऱ्या व्यक्तींची माहिती (उदा. प्रवासाचा इतिहास, वैद्यकिय तपासणी इ.) ओळखपत्र तसेच प्रतिज्ञालेख इत्यादीची माहिती रिसेप्शन काऊंटरवर देणे बंधनकारक राहील.
4) आरोग्य सेतू या अॅपचा हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तींने वापर करणे बंधनकारक राहील.
5) हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत असलेल्या खोलीमधील स्वतःहून स्वच्छता करण्यास प्रोत्साहीत करण्यात यावे.
सूविधांची माहिती
१) रेस्टॉरेंटमध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्याचे दृष्टीने सविस्तर मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील याची दक्षता घ्यावी.
२) सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी आसन व्यवस्थेची पूर्नरचना करावी.
३) ई-मेन्यु आणि डिस्पोसेबल पेपर नॅपकिन्स चा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
४) शक्यतोवर जेवणाकरिता (Room Service or Take aways) पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
५) रेस्टॉरेंट केवळ निवासी अतिथी साठीच उपलब्ध असतील याची कोटेकोरपणे दक्षता घ्यावी.
६) ज्या ठिकाणी खेळाचे साधने, लहान मुलांचे खेळाचे ठिकाणे, स्विमींग पूल, व्यायामशाळा (जेथे लागू असेल तेथे ) बंद राहतील.
७) मोठे संमेलने, एकत्र येणे, मंडळे इत्यादींना आवारामध्ये निर्दिष्ट राहील. तथापि जास्तीत जास्त १५ सहभागींच्या अधिन राहून ३३ % क्षमतेवरील सभागृहाचा वापर करण्यास परवानगी राहील.
साफसफाई स्वच्छता व निर्जतुकीकरण
१) खोली रिक्त झाल्यावर खोली व खोलीमधील इतर क्षेत्राची स्वच्छता करण्यात यावी. ग्राहकांचा मुक्काम संपल्यावर वापरण्यात येणारी खोली किमान २४ तास रिक्त ठेवण्यात यावी.
२) ग्राहकांनी खोली सोडल्यानंतर सर्व कपडे, टॉवेल्स इ. साहित्य बदलणे आवश्यक राहील. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, हात धुण्याचे स्थान यावर विशेष लक्ष देण्यात यावे.
३) खोली अथवा पृष्ठभागाची १ % सोडीयम हायपोक्लोराईट चा वापर करुन स्वच्छता करणे बंधनकारक राहील. ४) नियमित अंतराने वॉशरुमच्या खोलीची स्वच्छता करण्यात यावी.
५) अतिथी, ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स, मास्क, हातमोजे यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
संशयित किंवा पुष्टी झालेल्या व्यक्तीबाबत करावयाची कार्यवाही
१) आजारी असलेल्या, संशयित किंवा पुष्टी झालेल्या व्यक्तीला इतरांपासून वेगळ्या खोलीत ठेवण्यात यावे.
२) निकटच्या रुग्णालयाला त्वरीत कळविण्यात यावे. अथवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्यात यावा.
३) नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे जोखीमेचे आकलन केले जाईल. निर्जंतुकीकरण आवश्यकतेबाबत पुढील कार्यवाहीची अंमलबजावणी केली जाईल.
४) जर एखादा व्यक्ती पॉझीटीव्ह आढळला तर त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका व महानगरपालिका क्षेत्र वगळून नगर पालिकाक्षेत्रात मुख्याधिकारी व इतर क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकारी /तालुका दंडाधिकारी यांनी तपासणी करावी.
त्याच प्रमाणे संबंधीत क्षेत्रातील पोलीस विभागाने वास्तव्यास असलेल्या अतिथींची आवश्यक माहिती प्राप्त करुन नियमानुसार कार्यवाही करावी. हे आदेश दि. ३१ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत(२४.०० वा.) संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता कंटेटंमेन्ट झोन , प्रतिबंधीत क्षेत्र वगळून लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित व्यावसायिका विरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.