अकोला,दि.२- कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता बार्शी टाकळी येथील रहिवाशांच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी संकलन करण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. तर नागरिकांनी नमुने देण्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी टाकळी येथे आढावा बैठक घेण्यात आली. याबैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले, तहसिलदार गजानन हमंद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शर्मा, मुख्याधिकारी स्नेहल रहाटे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी तालुक्यात व बार्शी टाकळी शहरात कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. स्थानिक अधिकाऱ्यांनी संपर्क तपासणीवर भर द्यावा. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. स्वॅब चाचणीसाठी पाठविण्याकरीता त्याचे संकलन केंद्रावर जोखमीचे, संदिग्ध व अन्य व्याधीग्रस्त नागरिकांनी जाऊन आपले नमुने द्यावे यासाठी अधिक खबरदारी घ्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
नगरपंचायत येथे बैठक
त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली व नगरपंचायत येथे बैठक घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष महेफुज खान तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी आवाहन केले की, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मनातील भिती दूर करावी, अ त्यांना चाचण्या करुन घेण्यास प्रेरीत करावे. बार्शी टाकळी येथे स्वॅब संकलनाची आरोग्य केंद्रात सोय करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांची मागणी असेल तर आणखी एक केंद्र उभारण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.