अकोला,दि.२- जिल्हा कारागृहातील बंदीजन व कर्मचारी अशा एकूण ५२३ जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यातील ४८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात ७२ जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत सर्व अहवाल निगेटीव्ह आले असून ३५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिली आहे.
अकोला जिल्हा कारागृहातील ७१ पुरुष बंदी व एक कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तात्काळ उपाययोजना व सर्वांच्या तपासण्या करण्याची कार्यवाही सुरु केली. त्यासाठी कारागृहातच बॅरेक क्रमांक पाच मध्ये स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे.
बंदीजनांच्या तपासण्या व त्यांचे अहवाल प्राप्त झाल्याचे विवरण खालील प्रमाणे- दि. २२ जून रोजी २० पुरुष बंद्यांना लक्षणे जाणवल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. दि.२४ जून रोजी प्राप्त अहवालात १८ जण बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर २६ जून रोजी १३४ बंद्यांच्या चाचणीनंतर त्यातील ५० जण बाधीत असल्याचे दि.२८ जून रोजी प्राप्त अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर दि. २७ जून रोजी १५४ पुरुष बंदी, ३९ महिला बंदी, चार लहान मुले व दोन कर्मचारी असे १९९ जणांची तपासणी केली असता एक पुरुष बंदी बाधीत असल्याचे दि.१ जुलै रोजीच्या अहवालात स्पष्ट झाले. तर दि. २९ जून रोजी ५३ पुरुष बंदी, पाच महिला बंदी, ७५ कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी असे १३५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांचेही अहवाल दि.१ जुलै रोजी प्राप्त झाले त्यात दोन पुरुष बंदी व एक कर्मचारी असे तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. असे आतापर्यंत ४८८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ३५ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून प्राप्त झाली असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सांगितले.
या सर्व बाधितांना कारागृहातच सर्व उपचार सुविधा देण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.