अकोला– महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्याआदेशानुसार दि.३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविण्यात आला असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भात दि. ०२ जून २०२० रोजी पारीत केलेले आदेश दिनांक ३१ जूलै २०२० चे मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याचे आदेश आज निर्गमित केले आहेत.
हे आदेश दिनांक ०१/०७/२०२० चे ००.०० वा. पासून ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.
१. रात्रीची संचारबंदी – संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती, नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्त संचार करण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ९.०० ते सकाळी ५.०० वा. पर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे.
२. या कार्यालयाचे दिनांक २७.०६.२०२० च्या आदेशान्वये केशकर्तनालय ( कटींग) सलून आणि ब्युटीपार्लरची दुकाने विहीत अटी व शर्तीनुसार सकाळी ९.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत पुढील आदेशापर्यंत खुली ठेवण्यात येतील.
३. लग्न समारंभ, अंत्यविधी व मंगल कार्यालय या करिता या कार्यालयाने निर्गमित केलेले दिनांक २३.०६.२०२० रोजीचे आदेश पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात येत आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.