अकोला,दि.३०- कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असतांना आता त्याचा ग्रामिण भागातही शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत संदिग्ध वाटणारे रुग्ण, अन्य व्याधींनी ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक असे जोखमीच्या व्यक्तिंचा प्रत्येक गावनिहाय आढावा घ्या, दैनंदिन तपासणी व चाचण्यांवर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व यंत्रणांना दिले.
जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी ग्रामिण भाग तसेच जिल्ह्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रात राबवावयाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामिण भागनिहाय कोरोना संसर्ग फैलाव , उपचार सुविधा व उपाययोजना या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी निर्देश देण्यात आले की, मनपा हद्दीत तसेच ग्रामिण भागात वा जिल्ह्यातील अन्य शहरी भागात प्रतिबंधित क्षेत्रातून कोणालाही ये-जा करण्यास मनाई आहे, याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक ठिकाणी एका पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान २० वा आवश्यकता भासल्यास अधिक संपर्क तपासले गेले पाहिजे व त्यांच्या चाचण्या झाल्या पाहिजे. ग्रामिण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्ण वाहिकेची उपलब्धता आरोग्य यंत्रणांनी सुनिश्चित करावी. तालुका पातळीवर काम करणारे तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक, आधीपासूनच व्याधीग्रस्त असणारे (मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, दमा इ.) व्यक्ती, गरोदर माता या सगळ्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. जोखमीच्या व्यक्तींची ऑक्सिजन पातळी दररोज तपासली जावी. आपापल्या तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला तर संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्याशीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरुन संपर्कात रहावे. त्यांना कशाची गरज असल्यास तसे जिल्हास्तरीय कक्षास कळवावे, जेणे करुन रुग्णाला अधिक चांगली सेवा देता येईल.
चाचण्या वाढविण्यासाठी स्वॅब संकलन केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर, अकोट व पातूर येथे हे केंद्र सुरु करण्यात यावे, अशी सुचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली. संपर्क शोध वाढविणे, चाचण्यांची संख़्या वाढविणे व ग्रामस्तरीय समित्यांमार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तिनिहाय जोखमीच्या व संदिग्ध लोकांचा आढावा घेण्यात यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणेला दिला.
‘हॅप्पी हायपॉक्झिया’ या अवस्थेपासून बचाव करा
कोविडच्या अनुषंगाने वारंवार शरिरातील ऑक्सिजन पातळी तपासणे आवश्यक आहे. ज्याला SpO2 पातळी असे म्हणतात. ही पातळी ९५ ते १०० पर्यंत सामान्य समजली जाते. ९५ ते ९० पर्यंत ही पातळी असल्यास तो व्यक्ती जोखमीचा ठरतो. त्यावर सातत्याने लक्ष देणे व निरीक्षण ठेवणे आवश्यक असते. आणि ही पातळी ९० पेक्षा कमी झाल्यास त्या व्यक्तीस तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. साधारणतः दम लागणे, धाप लागणे हे ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे प्राथमिक लक्षण असते. मात्र धोका तेव्हा असतो जेव्हा रुग्णाला याबाबत जाणीवच होत नाही. या अवस्थेला ‘हॅप्पी हायपॉक्झिया’ असे म्हणतात. विशेष म्हणजे कोविड बाधितांमध्ये ही अवस्था जास्त आढळू शकते. त्यामुळे असे रुग्ण ओळखण्यासाठी त्या व्यक्तीला पाच ते सहा मिनीटे चालायला सांगावे, असे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित यंत्रणांना केले.