अकोला,दि.३०- भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत ए. एस. नाथन (समाजसेवक) संस्थापक यांच्या मार्फत जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या संकल्पाचा भाग म्हणून या वर्षी प्रत्येक नागरिकाने आपापल्या गावात, शेतात, घराजवळ कडु लिंबाच्या बिजाचे रोपण करा,असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिनस्त यंत्रणांना कळविले आहे.
भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहिम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे.
या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फुट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजुबाजुला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजुबाजुला व इतर पडीक जमीनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांचेमार्फत बियांचे रोपण करण्यात यावे.
निंबाच्या झाडांच्या बिया ह्या एक महिन्यामध्ये रोपण न केल्यास त्यांचा कालावधी संपून त्यापासुन झाडांची निर्मिती होणार नाही. या गोष्टीची खबरदारी घेऊन ग्रामपंचायत/नगरपालिका यांनी त्यांचे क्षेत्रातील नागरिकांना याबाबत अवगत करावे. हा उपक्रम राबवितांना सर्व नागरिकांनी त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, याकरिता सामाजिक अंतर पाळावे तसेच या कार्यालयाकडून यापूर्वी व वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेशांचे पालन करावे. उपरोक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निंबाच्या झाडाच्या बियांचे रोपण केल्यास अकोला जिल्ह्यास खालीलप्रमाणे फायदे होतील.
अकोला वासियांना उन्हाळ्यात जास्त तापमानांचा सामना करावा लागतो. जर जिल्ह्यात निंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण झाल्यास त्यामुळे वातावरण थंड होऊन उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होण्यास मदत होते. या झाडांची पान माकडे/वानरे खात असल्यामुळे माकडांकडुन शेतीतील पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. हे झाड शेताच्या बांधावर लावल्यास त्यांचे पाने शेतात पडुन नैसर्गिक खताची निर्मीती होते. निंबाचे झाड हे औषधी वनस्पती आहे. तसेच झाडामुळे ऑक्सीजनची मात्रा वाढते तसेच प्रदुषण कमी करते.या झाडांमुळे जमीनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या बीज रोपणामार्फत जी झाडे उगवतील त्यांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच हे झाड उन्हाळयात हिरवेगार राहते. या झाडांचे लिंबोळी आणि पानांपासून फवारणीकरीता लिंबोळी अर्क बनविता येतो, असे अनेक फायदे या झाडाचे असल्याने या लागवड अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करावे,अशी सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिनस्त यंत्रणांना केली आहे.