अकोला (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे समतादूत प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे हे जनजागृतीपर कार्यक्रम समतादूत यांचे माध्यमातून छोटेखानी घरगुती स्वरूपात राबविण्यात येत आहेत.त्यातीलच एक उपक्रम हा अकोला जिल्हातील समतादूत टीम च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.बार्टी महासंचालक कैलास कणसे,समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,सहाय्यक प्रकल्प संचालक अमरावती विभाग राहुल कऱ्हाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात यावर्षी राज्यसेवा परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्राविण्य मिळवित प्रशासनात प्रथम व द्वितीय श्रेणी उच्चपदी निवड झाली अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यामध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये अकोला जिल्हातील अकोट येथील अनिकेत रामरतन पुंडकर यांची नायब तहसीलदार पदी तसेच तेल्हारा येथील शुभम शंकरराव बहाकार यांची तहसीलदार पदी निवड झाली असून यांचा समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांनी समतादूत प्रकल्प बार्टी,पुणे च्या वतीने त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा भारताचे संविधान,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा,संविधान उद्देशिका तसेच बार्टी प्रकाशन विभागाचे पुस्तके देऊन आई वडिलांसमवेत सन्मान केला.त्याचप्रमाणे समतादूत प्रकल्प अकोला जिल्हाच्या वतीने यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती ही ऑनलाइन पध्दतीने कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली त्यामध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना समतादूत टीम च्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.यावेळी समतादूत टीम च्या वतीने अभिनंदन व सत्कार स्वीकारत सत्कारमूर्ती नवनिर्वाचित नायब तहसिलदार अनिकेत पुंडकर व तहसीलदार शुभम बहाकार यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होऊन समतादूत टीम अकोला सदस्य यांच्याशी हितगुज करत आपले अनुभव रुपी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांनी बार्टीचे उद्दिष्टे व यशोगाथा मांडली.तसेच समतादूत रविना सोनकुसरे यांनी समतादूत प्रकल्पाचे कार्य यावेळी विषद केले असता सत्कारमूर्ती ना.तहसीलदार अनिकेत पुंडकर व तहसीलदार शुभम बहाकार यांनी सत्काराबाबत आभार मानत “बार्टी” च्या सर्व प्रेरणादायी समाजपयोगी उपक्रमाचे मनस्वी कौतुक केले व बार्टी समतादूत प्रकल्पाला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन विजय बेदरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन समतादूत ऍड. वैशाली गवई यांनी केले.
या ऑनलाइन कार्यक्रमात समतादूत प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्यासह जिल्हातील तालुका कार्यक्षेत्रात कार्य करणारे समतादूत उपेंद्र गावंडे,स्मिता राऊत,बालाजी गिरी,शुभांगी लव्हाळे,मनेश चोटमल,रविना सोनकुसरे,वैशाली गवई,समता तायडे,प्रज्ञा खंडारे,विनोद सिरसाट सहभागी झाले होते.