अकोला – अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाजमा फोरेसिस युनिट आज सोमवार दि.२९ पासून कार्यान्वित होणार आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे युनिट्स कार्यान्वित होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी साडेबारा वाजता करणार आहेत.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात हे युनिट सुरु करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच राज्य शासनाद्वारे ऑटोमेटेड ब्लड कलेक्शन सिस्टम प्राप्त झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
प्लाजमा फोरेसिस कसे काम करते?
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.यासाठी पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णाकडून प्लाझ्माफेरसिस या यंत्राद्वारे प्लाझ्मा संकलित केला जातो. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो. तरी अकोला जिल्ह्यातील कोविड आजारातून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांनी आपला प्लाजमा दान करावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले आहे.