अकोला,दि.२३- कोविड वा नॉन कोविड कोणत्याही रुग्णावर उपचार करणे बंधनकारक असून त्यादृष्टीने सर्व खाजगी रुग्णालयांनी उपचार व्यवस्था सज्ज ठेवावी. रात्री बेरात्री केव्हाही पेशंट आल्यास त्यास उपचार सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
नॉन कोविड रुग्णास उपचार सुविधा सर्व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असूनही सेवा मिळत नाही, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत खाजगी रुग्णालय व इस्पितळचालकांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, डॉ. एम. डी. राठोड, डॉ. दिनेश नैताम, डॉ. आदित्य महानकर, ओझोन रुग्णालयाचे डॉ. भालचंद्र हुंडीवाले, डॉ. नितीन हिंगणकर, न्यु ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत वानखडे, आयकॉन हॉस्पिटलचे डॉ. के.के. कुलवंत, नोडल अधिकारी डॉ.रमेश पवार, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या समन्वय अधिकारी डॉ. आश्विनी खडसे इ. उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश देण्यात आले. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथून समन्वय साधला जाईल. ज्या खाजगी रुग्णालयात कोविड उपचारासाठी बेडस राखून ठेवले आहेत. तेथील उपचार सुविधांचा आढावा घेण्यात आला. खाजगी रुग्णालयात असले तरी त्या रुग्णाला घरुन जेवण मागविण्यास परवानगी देऊ नये. जेवण हे रुग्णालयानेच पुरवावे. नातेवाईकांना भेटू देण्यास मनाई असेल. तसेच खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील कोविड रुग्णांची माहिती पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. नॉन कोविड आजारांबाबत कोणत्याही रुग्णास उपचार केल्याशिवाय जाऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
अधिक वाचा: पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा (सुधारीत)