अमरावती, दि. 23 : माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीची पालखी यंदाही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार आहे. सव्वाचारशे वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या या पालखीत कोरोना संकटामुळे खंड पडणार नाही. आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.
आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त दि. 1 जुलै रोजी आषाढी यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली, मात्र महत्वाच्या पालख्यांना योग्य ती दक्षता घेऊन पालखी आणण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात नऊ पालख्यांना मान्यता देण्यात आली आहे.
कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहणार आहे. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार असल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिका-यांनी तसे पत्र श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रूख्माई संस्थानच्या विश्वस्तांना पाठवले आहे. आषाढी यात्रेचा कालावधी आषाढ शु. 1 (22 जून) ते आषाढ शु. 15 (5 जुलै) असा राहणार आहे. माता रुक्मिणीची पालखी घेऊन येणा-या भाविकांची नावे मंदिर समितीस कळविण्याबाबत पत्र संस्थानला देण्यात आले आहे. त्यानुसार समितीतर्फे येणा-या भाविकांना प्रवेशपत्रिका दिल्या जाणार आहेत.
सांस्कृतिक संचिताची जपणूक
श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते. सव्वाचारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकांतील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राचे हे सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. योग्य ती दक्षता घेऊन पालखी नेण्यात येईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
कौंडण्यपूर ही विदर्भ राज्याची राजधानी होती. प्राचीन काळात दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून त्याला मान्यता होती. अयोध्येसारख्या प्राचीन शहरांशी त्या काळात हे ठिकाण जोडलेले होते. माता रुक्मिणीचे माहेर असल्याने आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला अखंडितपणे पालखी जाते. ही पालखी परंपरा विदर्भातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. कोरोना संकटकाळात पालखीचे अबाधितपण कायम राखल्याबद्दल वारकरी, भाविकांमध्ये चैतन्य पसरले आहे.
श्री क्षेत्र कौंडण्यपूरप्रमाणेच आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान, सासवड येथील श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई देवस्थान, पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज देवस्थान, पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान, सासवड येथील श्री चांगावटेश्वर देवस्थान येथून पालख्या आषाढीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला येणार आहेत.