पातूर (राहुल अत्तरकार): जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रसिद्ध असलेली भारतातील लोकांकडून स्थापन केलेली लोकहितास्तव निष्पक्ष निर्णय घेऊन लोककल्याण करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. पूर्वी भारतासह जगात राजेशाही किंवा हुकूमशाही चालायची, म्हणजे राजा व त्याच्या मंत्रिमंडळाने जी व्यवस्था तयार केली त्याचे पालन त्याकाळात करणे बंधनकारक होते. कालांतराने त्यात बदल होऊन त्याचे रूपांतर “लोकशाही” मध्ये झाले. या लोकशाहीचे ४ स्तंभ अस्तित्वात आले. त्यातला चौथा स्तंभ म्हणजे “माध्यमे”. हि प्रसारमाध्यमे पूर्वीपासूनच सामान्यांचा आवाज म्हणून राज्यकर्त्यांसमोर उभी राहली आहेत. लोकशाहीच्या मंदिराला आपल्या निष्पक्ष पत्रकारितेतून आधार देण्याचं काम हा चौथा स्तंभ करत आला आहे. पण, वर्तमानात या चौथ्या स्तंभाला तडा गेला का?
तर याचे उत्तर बहुतांश लोक ‘हो’ असे देतील. सध्यस्थितीत मुळ धारेतील ‘डिजिटल माध्यमांना’ बघून तरी असेच वाटत आहे. एकेकाळी लोक दूरदर्शनचं बातमीपत्र आवर्जून पाहायचे, कारण त्यात ठळक आणि महत्वाच्याच राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्थरांवरील घडामोडी अगदी सभ्य भाषेत कुठल्याही आगाऊ पार्श्व संगीताशिवाय मुद्देसूदपणे बातमी वाचकांकडून वाचल्या जायच्या, आजही तीच शैली दूरदर्शन वर पाहायला मिळते. पण जेव्हापासून खाजगी मिडिया या क्षेत्रात आला तेव्हा पासून दूरदर्शनकडे सर्वांनी दूर्लक्ष केले हे त्याचं दुर्दैव. खाजगी माध्यमे या क्षेत्रात आली याचा लोकांना फायदाच झाला, त्यांना त्यांच्या भौतालच्या बातम्या पाहणं सहज शक्य झालं. पण त्या खाजगी माध्यमांची गुणवत्ता बिघडली आहे का?
आज जो चॅनेल पहाव त्यात ब्रेकिंग न्यूज असतात, दिवसातून ३ वेळ तीच ब्रेकिंग न्यूज माध्यमं चालवतात. एखादी निरर्थक गोष्ट घडली कि त्यावर वाद-संवाद ज्याला आजकाल ‘डिबेट शो’ म्हणतात ते चालवितात. त्यात पॅनल मधली रोजची सारखी मंडळी, आक्रमक अँकर आणि डिबेटचं भडकाऊ शीर्षक एवढं ५ मिनिटे जरी एखाद्या सामान्य समंजस व्यक्तीने पाहिलं तरी त्याला त्या डिबेटचा सारांश समजतो, आणि आजकाल तर त्या डिबेट मध्ये असभ्य भाषा व काही प्रमाणात हिंसा पण पाहायला मिळते. काही नावाजलेले अँकर तर डिबेटदरम्यान इतके आक्रमक होतात कि धार्मिक तेढ निर्माण करणारे, एखाद्या व्यक्तीला स्वतः न्यायाधीश असल्यासारखे दोषी ठरवणारे वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यात हे न्यूज अँकर्स किती निष्पक्ष असतात हे पाहणाऱ्याला दिसतेच. अशा काही अँकर्सवर अलीकडच्या काळात पोलिसात तक्रारी हि झाल्या पण अजूनही त्यांनी त्याची शैली बदलली नाही. जात, धर्म, विशिष्ट समाज अशा संवेदनशील मुद्यांवर तासंतास डिबेट करून हे चॅनेल्स लोकांची माथी भडकावून लोकांमध्ये तेढ निर्माण करीत आहेत असं माझं वयक्तिक मत आहे.
या माध्यमांना बातमी दाखवायची एवढी घाई झालेली असते कि सत्य न जानता बातमी प्रसारित करतात, शिवाय आजकाल एखादी साधी बातमी मोडूण-तोडूण त्याला कसं धार्मिक व राजकीय रंग देता येईल याकडे यांचा खूप जास्त कल दिसत आहे. अशाने त्यांच्या चॅनेलची ‘टीआरपी’ वाढते..!
खरंतर हा खेळ फक्त त्यांच्या प्रसिद्धीचाच आहे, त्यांना बाकी गोष्टींचं काही देणंघेणं नाही. एखादी बातमी वरून आली कि जनतेसमोर त्याला कसं प्रस्तुत करायचं यावरच त्यांचा भर..! जी बातमी जास्त टीआरपी देईल तीच जास्त चालवायची व बाकी महत्वाच्या लोकहिताच्या बातम्यांना डावलायचं हा गंभीर प्रकार प्रसार माध्यमांकडून केला जात आहे.
अलीकडच्या काळात एका अभिनेत्याने आत्महत्या केली तर २-३ दिवस तोच विषय या माध्यमांवर झळकत होता. प्रसारणासंबंधी असलेल्या मार्गदर्शक सूचनांना धाब्यावर बसवून आत्महत्येसंबंधित ज्या बाबींचे प्रसारण करता येत नाही त्याच बऱ्याच नामांकित न्यूज चॅनेल्सने प्रसारित केल्या. शिवाय आत्ताच्या ताज्या चालू असलेल्या भारत-चीन सीमावादावर एका विशिष्ट चॅनेलच्या महिला पत्रकाराने सरकारच्या जवाबदाऱ्यांवर पांघरून घालून झालेल्या घटनेचं खापर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्यावर फोडलं. ह्या आणि अशा अनगिणत बातम्या रोज माध्यमे प्रसारित करतात. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर काय होतो याचे भान या माध्यमांना राहिलेलं नाही का?
हीच का यांची पत्रकारिता?
माध्यमांकडून जनतेला हेच अपेक्षित आहे का?
देशातल्या कित्येक अडचणी, प्रश्न, महत्वाचे मुद्दे यावर हि प्रसारमाध्यमे कधी बातम्या प्रदर्शित करतील?
जनतेला मूळ मुद्यांपासून दूर ठेवायचं कामच हि माध्यमे करणार आहेत का?
आणखी किती दिवस असंच चालू राहील?
माध्यमांवरचा लोकांचा उडालेला विश्वास ते परत मिळवतील का?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली मालिन होत चाललेली प्रतिमा पुनः प्राप्त करेल..