भारतीय लोकशाहीचे विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रचार प्रसार माध्यमे हे चार आधारस्तंभ आहेत. पहिले तीन हे संविधानिक आहेत, म्हणजे संविधानामध्ये त्यांची संहिता अंतर्भूत केलेली आहे, तर चौथा हा असंविधानिक म्हणजे त्याची संहीता ही संविधानामध्ये अंतर्भूत नसून वेगळी ठरवलेली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा असंविधानिक जरी असला तरी त्याला भारतीय लोकशाहीमध्येच नव्हे, तर विश्वभरामध्ये खूप महत्त्व आहे. कारण कोणत्याही छताचा डोलारा हा चार खांबांवर विसंबून असतो. त्यातील एखादा थांब जरी डळमळीत झाला, तरी त्याला आधार देण्याचं किंवा जाग्यावरच थांबवून ठेवण्याचं काम इतर थांब करत असतात. तसंच काहीसं कार्य लोकशाहीच्या खांबरुपी संस्थाचं आहे.
विधायिका कायदा तयार करण्याचे कार्य करते. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यपालिकेची आहे. तयार केलेला कायदा हा भारतीय संविधानाच्या विसंगत असेल, तर त्याला रद्दबातल ठरवून, संविधानातील तरतुदी प्रमाणे तो कसा असावा हे मार्गदर्शन करण्याचे काम न्यायपालिकेचं आहे. न्यायपालिका जर असंविधानिक निर्णय देत असेल, तर त्यातील न्यायाधीशांची महाभियोगाद्वारे सेवा समाप्त करण्याचा अधिकार हा विधायीकेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो कि ह्या संविधानिक असणाऱ्या तीनही संस्थांना स्वायत्तता जरी असली तरी त्या एकमेकांना बांधील असून विधायिका त्यामध्ये सर्वोच्च स्थानी आहे कारण ती लोकप्रतिनिधींची बनलेली असते. लोकप्रतिनिधी संविधानानुसार लोककल्याणाचं कार्य, जर व्यवस्थित पार पडत नसतील, तर त्यांचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असल्यामुळे लोक त्यांना पुढल्या वेळेस नाकारू शकतात. अर्थात लोकशाहीमध्ये विधायिकेपेक्षाही लोक श्रेष्ठ ठरतात.
प्रचार प्रसार माध्यमांच्या संदर्भात जर विचार केला तर लोकशाहीमध्ये त्यांची अनन्यसाधारण महती आहे. ज्याप्रमाणे हत्ती कितीही मोठा असला तरीही त्याला अंकुशाचा मार देऊन नियंत्रित करता येते, त्याप्रमाणे तो अंकुश हा प्रचार प्रसार माध्यमांच्या हातामध्ये असतो. लोकशाहीच्या संविधानिक संस्था थोड्या जरी आपल्या कार्यामध्ये चुकायला लागल्या तरी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देऊन, बरोबर कार्य करण्यासाठी लेखणीरुपी अंकुशाचा मार देण्याचं काम प्रचार प्रसार माध्यमांचे आहे. एवढ्यावर काम भागत नसेल तर मात्र त्यांना कठोर पावले उचलून जनजागृती करावी लागते. जागृत झालेले जन, मग त्यांना संविधानाने अनुच्छेद 326 प्रमाणे बहाल केलेला मताधिकार वापरून विधायिके मधील आपले जनप्रतिनिधी बदलून त्यांच्यामार्फत इतर संस्थांमधील संविधानिक फेरबदल त्यांना सहज शक्य असते.
गेल्या काही दिवसांपासून प्रचार प्रसार माध्यमांबद्दल (काही सन्माननीय अपवाद वगळता) मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये असंतोष दिसून येतो. ते आपलं कर्तव्य नीट पार पडत नसल्याचे लोक बोलताना दिसतात. त्यामुळे इतर संविधानिक संस्थांची मनोपल्ली वाढल्याचीही खंत लोक व्यक्त करतात. प्रचार प्रसार माध्यमे कुणाच्यातरी दडपणाखाली किंवा मिळणाऱ्या सोयी सवलती तथा सुविधांच्या अपेक्षेने आपल्या मूळ तत्त्वांना तिलांजली देऊन इशूला नॉनइश्यू व नॉनइश्युला इश्यू करण्यामध्ये आपली सर्व शक्ती खर्च करताना दिसतात. परंतु भीतीपोटी असो अथवा स्वार्थापोटी वाट चुकलेल्यांना ते मार्गस्थ करत नसल्यामुळे देशाचे तथा जनतेचे खूप मोठे नुकसान होऊन, त्या पाप-पुण्याचे आपणही वाटेकरी आहोतच, हे कुठेतरी ते विसरताना दिसतात. त्यामुळेही अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचेही दिसून येते.
आज जगभरामध्ये कोरोना महामारी ची खूप मोठी समस्या उभी ठाकलेली आहे. त्या महामारीने भारतातही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरवले आहेत. ती एक नैसर्गिक आपदा असतानाही त्याला काही सन्माननीय माध्यमं जाती-धर्मांचा रंग चढवण्याचे कार्य करताना दिसून आले. ते कार्य चूक ठरल्यामुळे त्यामध्ये काहींना माफी मागावी लागली, तर काहींवर गुन्हे दाखल झाले. आज भारतामध्ये जातीयता, अस्पृश्यता, धर्मांधता, भ्रष्टाचार, खाजगीकरण, स्त्रियांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, जातीय हल्ले इत्यादी समस्या ‘ आ ‘ वासून उभ्या आहेत. त्यांना हव्या त्या प्रमाणात कव्हरेज मिळत नसल्यामुळे त्या सुटताना दिसत नाहीत. म्हणून आज-काल अनेक लोकांनी सोशल मिडियाचे सहकार्य घ्यायला सुरुवात केलेली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना चार- दोन नियमांचे पालन वगळता, फार मोठी बंधने नसल्याचे दिसून येते. वापरण्यासाठी सुद्धा सहज आणि सोपी आहेत. त्यांचं बहुतांशी संशोधन हे विदेशी असल्यामुळे, इतरांप्रमाणे त्यांना जात-धर्म स्त्री-पुरुष गरीब-श्रीमंत लहान-मोठा राजकारणी किंवा सर्वसामान्य अशा कोणत्याच गोष्टींचे सोयरसुतक नाही. उलट तो कोणीही आणि कितीही मोठा असला, तरी सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर त्याचे किती फॉलोअर्स आहेत यावर त्यांची पत किंवा प्रसिद्धी निश्चित केली जाते. या माध्यमातूनही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येताना नजरेस पडली. आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून रस्त्यावर पोट भरणाऱ्या अनेकांना सोशल मीडियाने यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवताना, ‘ याचि देही, याचि डोळा ‘ पाहायला मिळाले. माझ्यासह अनेक लेखक, कवी साहित्यिकांची तथा व्याख्यात्यांची प्रतिभा आणि प्रतिमा फळारूपाला आल्याचे श्रेय सुद्धा सोशियल मीडियाचेच आहे. आपण यांना पाहिलं का? हे सदरच इतर प्रसारमाध्यमातून लुप्त झाल्याचे दिसून येते. कारण असे काही घडल्यास लोक अतिजलद तथा विनामूल्य असणाऱ्या सोशल मीडियाचे सहकार्य लोकांना जास्त परवडल्यासारखे वाटते.
आज भारतामध्ये अनेक लोक, काही संस्था संघटना किंवा पक्षांच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारधारेवर तथा समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व या महान मानवी मूल्यांवर आधारित समतावादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस तन-मन-धनाने अविरत प्रयत्नरत दिसतात. परंतु त्यांना हव्या त्या प्रमाणात यश मिळताना दिसत नाही. कारण इतर काही प्रसारमाध्यमांना महापुरुषांच्या विचारांचा वावडं असल्यामुळे किंवा ते स्वतः मनुवादाचे पाईक असल्यामुळे त्यांना समतावादी समाज व्यवस्था नको असते. म्हणून जनजागृती मध्ये उणीव जाणवते. परंतु आता त्यांच्या हातामध्ये सोशियल मीडियाचे शस्त्र आले आहे. त्याचा वापर करून त्यांना काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसून येते. टाळेबंदीच्या काळात अनेक विषयांना चर्चेस घेऊन, विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांच्या ऑनलाइन परिषदांचे आयोजन करून, प्रकरणांची सत्यता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं विधायक कार्य त्यांनी केल्याचे दिसून येते. वाढती जनजागृती पाहता त्यावरही बंदी आणण्याची मागणी न्यायालयाला झाली होती. परंतु त्यामध्ये ते अयशस्वी ठरले.
हे सर्व जरी खरं असलं तरी सोशल मीडिया ला सुद्धा काही मर्यादा आहेत. अफवा पसरवण्यासाठी, जनतेला भ्रमित करण्यासाठी त्याचाही गैरवापर होताना दिसतो . भारतीय जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात अशिक्षितपणा, अज्ञान, दारिद्र्य असल्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक समस्या आहेत. म्हणून हा मीडिया त्यांच्या अवाक्या बाहेरचा ठरतो आहे. कमी प्रमाणात का होईना त्याच्यासाठी नियमित खर्चही करावा लागतो. एवढं असूनही सोशल मीडियाचा वापर करणारे व त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या बरीच असल्याचे काही मनुवादी तथा विषमतावाद्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आपआपले तज्ञांचे चमू तयार करून आपली विचारधारा पसरवण्याचे कार्य ते सतत करत आहेत. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही प्राप्त होताना दिसते आहे. कारण मेंदूचा वापर न करता अनेक गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतामध्ये बऱ्यापैकी असल्याची संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून निसर्ग त्यांना सद्बुद्धी देवो हीच मंगल कामना.
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जी. अकोला