अकोला,दि.१९- शहरातील वाढता मृत्यूदर लक्षात घेता महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणातून निदर्शनास आलेले दुर्धर आजार असलेले, ज्येष्ठ नागरिक, ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे काम सुरु झाले आहे. शहरातील अकोट फैल, जेतवन नगर खदान या भागातून गेल्या तिन दिवसांत ४९६ स्वॅब जमा करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महानगरपालिका यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील अकोट फैल व खदान या प्रतिबंधीत क्षेत्रामधून दुर्धर आजार व ज्या रुग्णामधील ऑक्सिजन पातळीचे प्रमाण कमी आहे. अशा रुग्णाचे स्वॅब घेण्याची मोहिम (दि.१७) पासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी (दि.१७) अकोट फैल भागातून ११३ व खदान परिसरातून ७१ संशयित रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले. दुसऱ्या दिवशी (दि.१८) खदान भागातून ४५ व अकोट फैल परिसरातून ११३ स्वॅब जमा करण्यात आले. आज (दि.१९) अकोट फैल परिसरातून १५४ गेल्या तिन दिवसात ४९६ संशयीत रुग्णाचे स्वॅब जमा करण्यात आले आहे. यामध्ये अकोट फैल परिसरातील १० व खदान परिसरातील ६ असे एकूण १६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यामुळे पुढील संसर्ग रोखण्यात मदत झाली आहे व पुढील धोक्यापासून शहराला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. शहरातील अन्य भागातील रहिवासी असणारे दुर्धर आजार व ज्या रुग्णांच्या शरीरात ऑक्सीजन पातळीचे प्रमाण कमी आहे,अशा रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.