मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे वडील केके सिंह, मोठी बहीण आणि चुलतभाऊ आमदार नीरज कुमार हे फ्लाइटने मुंबईला पोहोचतील.
नीरज यांनी सांगितल्यानुसार, कुटूंबाला सुशांतवर पाटण्यात अंत्यसंस्कार करायचे होते, परंतु कोरोनामुळे प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता व्हिसेरा तपासणीचा अहवाल येण्याची वाट बघितली जात आहे. यात त्याच्या शरीरात विष होते की नाही, ते स्पष्ट होईल.
अपडेट्स…
सुशांतचे पार्थिव काही वेळातच त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यासाठी त्याचे मेहुणे ओ.पी.सिंग यांनी कागदावर सही केली.
पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितले – विलेपार्ले किंवा वांद्रे येथे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात. कुटुंबाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल.
सुशांतची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनमुळे तर तणाव वाढला नाही?
रविवारी सकाळी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये 34 वर्षीय सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांना सुशांतच्या खोलीतून एक फाइल मिळाली असून त्यावरुन त्याच्यावर सहा महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार सुरू असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे तो आपल्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाऊ शकला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सुशांतच्या मामांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जन अधिकार पक्षाचे नेते आणि माजी खासदार पप्पू यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
उशीरा रात्री मित्राला आणि सकाळी बहिणीला फोन केला होता
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने शनिवारी रात्री 12:45 वाजता आपल्या एका अॅक्टर मित्राला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नाही. रविवारी सकाळी सुशांत उठला. सकाळी नऊच्या सुमारास त्याने ज्युस प्याला. त्यानंतर त्याने मुंबईतच राहणा-या आपल्या बहिणीला फोन केला आणि मग बेडरूममध्ये निघून गेला. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास त्याच्या स्वयंपाकीने दुपारच्या जेवणासाठी अनेकदा दार ठोठावले. मोबाईलवर कॉल केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यानंतर चावीवाल्याला बोलावून बेडरूमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी सर्वांना सुशांतचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
मृतदेहाचा फोटो शेअर करणार्यांवर कारवाई केली जाईल
सुशांतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने चेतावणी दिली आहे. सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सायबर सेलच्या वतीने म्हटले गेले आहे.
भावाने सांगितले – नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुशांतचे लग्न होणार होते
सुशांतचा चुलत भाऊ नीरज यांनी सांगितल्यानुसार, हातात चित्रपण नसणे, हे त्याच्या आत्महत्येचे कारण असू शकत नाही. सुशांत आर्थिक संकटातून जात नव्हता. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुशांतचे लग्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.