अकोला,दि.१२- शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२० साठी स्वत:कडील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग, अमरावती यांनी केले आहे.
सोयाबीन हे स्वपरांग सिंचित पिक असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही कृषि सेवा केंद्रामधुन विकत घेतलेल्या प्रमाणित बिया पासुन उत्पादीत होणारे बियाणे सतत तीन वर्षा पर्यंत वापरता येते. सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के एवढे असावे असे निश्चित केले आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन तीन वर्षात सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ७० टक्के पेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच दुप्पटीहुन ज्यादा बियाणे शेतकरी खरेदी करतात. त्यामुळे सोयाबीन बियाणे वापराबाबत निश्चित शेतकऱ्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
प्रमाणित बियाण्यापासुन तयार झालेल्या बियाण्याची उगवण शक्ती तपासणी करून बियाण्याची गरज घरच्या उत्पादनातून भागविल्यास बाजारातील बियाणे मिळण्यासाठी करावी लागणारी पायपीट व बाजारातील बियाणे उगवण न झाल्यामुळे होणारा मनस्ताप सुद्धा टाळु शकतो. तसेच बियाणेवरील खर्च कमी होवून उत्पादन खर्चात बचत करता येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी होऊन घरचे बियाणे वापरल्यास फायदेशीर ठरते.
सध्या हंगाम पूर्व पाऊस पडण्यास सुरूवात झाली असुन नियमीत पाऊस सुरू झाल्यानंतर जमिनीत पुरेपूर ओल असल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करू नये. म्हणजे कमीत कमी ७० मि.मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर भरीव ओल झाल्याची खात्री झाल्यानंतर पेरणी करावी.
सोयाबीन बियाणे उगवण तपासणीची साधी व सोपी पद्धत
सोयाबीन बियाणे दरवर्षी बदलण्याची गरज नाही, कृषि सेवा केंद्रा मार्फत विकत घेतलेल्या प्रमाणित बियापासुन उत्पादीत होणारे बियाणे सतत तीन वर्षापयंत वापरता येते.घरच्या सोयाबीन च्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालुन मुठभर धान्य बाहेर काढा, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेवुन स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमीनीवर पसरवा काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन से.मी. अंतरावर तुकड्यावर ओळीत ठेवुन अश्या प्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाणेवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाकावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोलगुडांळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधुनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसानंतर ही गोलगुंडाळी जमीनीवर पसरून उघडावी, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून त्याची मोजणी करावी. तिन्ही गुंडाळीची सरासरी काढून १०० दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणेसारखेच गुणवत्तेचे आहे. असे समजावे आणि शिफारसी प्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाणेची टक्केवारी ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाणेच प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. ७० टक्के पेक्षा कमी बियाणे उगवले असेल तर त्या प्रमाणात बियाणेची मात्रा जास्त वाढविल्यास बाजारातील बियाणे एवढीच रोपाची संख्या राहुन अपेक्षित उत्पादन येते.
जसे,७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास शिफारशी प्रमाणे एकरी ३० किलो बियाणे वापरावे, ६५ ते ६९ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३२.५ किलो बियाणे वापरावे, ६० ते ६४ टक्के उगवण शक्ती असल्यास एकरी ३५ किलो बियाणे वापरावे, ५० टक्के पेक्षा कमी उगवण शक्ती असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे.
रायझोबीयम व पीएसबी या जिवाणु संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम १० ते १५ किलो बियाण्यास पेरणी पुर्वी तीन तास अगोदर बीज प्रक्रिया करून सावलीत वाळवावे, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशी रोगापासुन संरक्षणासाठी बिज प्रक्रिया करावी, जमिनीत पुरेशी ओल किंवा ७० मि.मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी.
उपरोक्त पद्धतीने बियाणेची पेरणी केल्यास निश्चीतपणे शेतकऱ्यांना बाजारातील बियाण्याप्रमाणे उत्पादन येइल. तेव्हा शेतकऱ्यांनी घरचे बियाणे तपासणी करून पेरणी करावे असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक,अमरावती विभाग, अमरावती यांनी केले आहे.