अकोला,दि.७- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२१ मे २०२० च्या अधिसुचनेनुसार कोवीड व अन्य रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा आरक्षित करुन औषधोपचार उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, सध्या अकोला जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांवरील ताण कमी करण्यासाठी अकोला शहरातील २८ रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत.
या संदर्भातील आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील वार्डांमध्ये जागा अपुरी पडत असुन शहरातील खाजगी रुग्णालये व त्यांच्याशी संलग्नित सर्व कर्मचारी व अधिकारी चमू सकट सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी कळविले आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांनी त्यांच्या अहवालामध्ये नमुद केलेल्या रुग्णालयामध्ये नॉन-कोविड रुग्णांसाठी शुल्क आकारणी करुन (On payment basis) सदर रुग्णालयांची सेवा उपलब्ध करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,२००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ नुसार प्राप्त अधिकारानुसार व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची अधिसुचना दि. २१ मे, २०२० मधील नमूद केलेल्या विविध बाबींवरील दरानुसार शुल्क आकारणी करुन, नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरीता रुग्ण दाखल करून घेणे (In door patient), त्यांचेवर ICMR चे मार्गदर्शक सूचनानुसार उपचार करणे इ. करीता नॉन कोविड रुग्णांना संदर्भित (रेफर) केल्यानुसार भरती करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अकोला शहरातील खाजगी रुग्णालये त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी सह यांच्या सेवांसह क्षमतेच्या ८०% खाटा आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.
खाटा आरक्षित केलेले रुग्णालये- ओझोन मल्टि स्पेशालिटी रुग्णालय, आयकॉन मल्टि स्पेशालिटी रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, आर.के. टी हॉस्पिटल, सहारा हॉस्पिटल, ऑर्बिट हॉस्पिटल, बागड हॉस्पिटल, मालोकार हॉस्पिटल, तुकाराम हॉस्पिटल, स्माईल हॉस्पिटल, भागडे हॉस्पिटल, गुप्ता हॉस्पिटल, शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पिटल, विदर्भ हॉस्पिटल, कोठारी हॉस्पिटल, के.एस. हॉस्पिटल, सिद्धीविनायक हॉस्पिटल, बिहाडे हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल, इंदिरा हॉस्पिटल, देहानकर हॉस्पिटल, निर्मय हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, बसंती हॉस्पिटल, माऊली हॉस्पिटल, दम्मानी आय हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल.
कार्यपद्धती खालीलप्रमाणे-
१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी त्यांचे रुग्णालयातील रुम्मांची संख्या व त्यांची परिस्थिती पाहून संबंधीत हॉस्पीटला संदर्भात रेकर) करण्यात यावे,
२.अधिष्ठाता यांनी संदर्भित (रेफर) केल्यानुसार संबंधीत रुग्णाला तात्काळ भरती करण्याची कार्यवाशी संबंधित हॉस्पिटलने कार्यवाही करावी.
३.रुणांवर आवश्यकतेनुसार तसेच ICMR चे मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करण्यात यावे.
४.जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी यासर्व बाबीवर नियंत्रण ठेवावे. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. रमेश पवार व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील राजेश पवार हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
शहरातील खाजगी रुग्णालयांच्या खाटा ह्या आरक्षित केल्यानंतर त्या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांना उपचार सुविधा उपलब्धतेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे उपस्थित होते.