अकोला,दि.४- कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी संस्थात्मक अलगीकरण केंद्र चालविण्यासाठी शहरातील हॉटेल रणजित येथील इमारतीत सशुल्क केंद्र चालविण्यास परवानगी देत असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.
त्यानुसार बसस्थानक अकोलाच्या मागे असलेल्या हॉटेल रणजित येथे शुल्क आकारुन संस्थात्मक अलगीकरण केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या केंद्रास आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे लागेल, या केंद्रात २८ बेड ची व्यवस्था असेल. याठिकाणी नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपस्थित ठेवावा लागेल. सुरक्षा साधने जसे पल्स ऑक्सिमिटर, व्हर्च्युअल असिस्टंट मॉनिटरिंग तसेच मास्क, डिजीटल थर्मामिटर इ. अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवाव्या लागतील. तसेच येथील रुग्णांकडून माफक शुल्क आकारावे,असेही आदेशात नमूद केले आहे.