अकोला,दि.४- शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला कार्यान्वित करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या १०१६ पदभरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र केवळ केवळ ४६५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर इतके मोठे रुग्णालय चालविणे शक्य नाही. त्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक सर्व आवश्यक पदांच्या पदमंजुरीचा प्रश्न सोडवून मंजूरी मिळवून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू असे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे हे आज अकोला जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ना. टोपे यांनी या इमारतीची पाहणी करुन या इमारतीत लवकरात लवकर रुग्णसेवा देता यावी यासाठी प्रयत्न करुन इमारतीचा प्रश्न मार्गी लावू. त्यासाठी पदभरती चा अडसर दूर करुन पूर्ण पदांसह हे रुग्णालय सुरु करु, असे आश्वासन दिले.
कोवीड केअर सेंटरला व प्रतिबंधात्मक क्षेत्रास भेट व पाहणी
आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी आपल्या दौऱ्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे स्थपण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी यावेळी तेथील निरीक्षणात ठेवण्यात आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतले. तसेच हरिहर पेठ येथील प्रतिबंधित क्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली. यावेळीही त्यांचेसमवेत सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.