अकोला,दि.२ – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर अनेक योजनांच्या खर्चाला शासनाने मर्यादा घालून दिल्या आहेत. तथापि, कोरोना महामारीच्या संकटातून धडा घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधांच्या निर्मितीवर आपण भर देऊ या. त्यासाठी ग्रामिण ते शहरी अशा विविध भागांसाठी आरोग्य सुविधा निर्मितीचा मास्टर प्लॅन तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
आज पालकमंत्री ना. कडू यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्च विवरणाचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. त्यात प्राधान्याने जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य विभाग या यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे, सीसीआय चे अजयकुमार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी सांगितले की, जिल्ह्यातील रुग्णालये ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त करतांनाच तेथील वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न असावे यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे. रुग्णालयांच्या भिंती ह्या बोलक्या करा. पावसाळ्याच्या दृष्टीने येणारे साथीच्या आजारांचे अनुमान लक्षात घेऊन तालुकास्तरापर्यंत जादा आरोग्य सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करा. रुग्णालयांमधील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था , देखभाल दुरुस्ती याबाबत अत्याधुनिक उपाययोजनांचा अवलंब करा, असे निर्देश त्यांनी दिले.
तसेच ज्या कामांना दिरंगाई झाली आहे अशा कामांचा आढावा घेऊन अहवाल द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत शाळा, रुग्णालये आदींच्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला.
शेतीमाल खरेदी प्रक्रियेचा आढावा
जिल्ह्यात कापूस, तूर, मका आणि हरभरा या पिकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या सर्व शेतकऱ्यांकडील माल वेळेत खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेबाबतही ना. कडू यांनी आढावा घेतला. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन यंत्रणेने शिल्लक मालाचे पंचनामे केले आहे. याबाबतही ज्या ज्या शेतकऱ्याच्या घरी पंचनामे झाले आहेत अशा शेतकऱ्यांकडील माल प्राधान्याने खरेदी करावा अशा सुचना ना.कडू यांनी दिल्या.