नवी दिल्ली : लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारने लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जून पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील सर्व उद्योग पुढील एक महिन्यात टप्प्पाटप्प्याने सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
मुख्य म्हणजे धार्मिक स्थळे, हॉटेल्स, मॉल्स ८ जून नंतर खुली होणार आहेत. तर रात्रीतील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे. आता रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी राहणार आहे. मेट्रो, सिनेमा हॉल, जिम्स, मनोरंजन पार्क, बार, सामाजिक, राजकीय धार्मिक सभांना परिस्थितीनुसार परवानगी दिली जाईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत नियम शिथिल करुन पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योग खुले करण्याची मागणी राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. राज्यांच्या मागण्यांचा विचार करुन केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
पाँडेचेरी, केरळ गोवा आणि ईशान्येकडील काही राज्ये ही पर्यटन उद्योगावर अवलंबून आहेत. पर्यटन तसेच हॉस्पिटॅलिटी उद्योगाला अद्याप लॉकडाऊनमधून सूट मिळालेली नाही. लॉकडाऊन ५ मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे आदी खुली करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
मर्यादित लोकांना प्रवेश आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पर्यटन उद्योग खुले करण्याची मागणी काही राज्यांकडून करण्यात आली आहे. पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योग सुरु झाल्यास काही प्रमाणात महसूल मिळण्यास मदत मिळू शकेल, अशी विनंती राज्यांकडून केंद्राला करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही प्रमाणात नियम शिथिल करुन उद्योग सुरु करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. याबाबत प्रदीर्घ चर्चा करुन केंद्र सरकारने जून महिन्यात टप्प्याटप्प्याने काही उद्योग सुरु करण्याबाबत नियमावली जारी केली आहे.