मुंबई : सोनू सूद अजूनही मुंबईहून परप्रांतीयांना आपल्या घरी पाठवत आहे. आपले काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्याच्या टीमने संयुक्तपणे टोल फ्री क्रमांकदेखील जारी केला आहे. याबाबत त्याने आपल्या सोशल मीडियावरही माहिती शेअर केली. बुधवारी बिहारकडे निघालेल्या बसेसच्या प्रवाशांना परत येण्याचे आवाहनही सोनूने केले आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत सोनूने एका मुलाखतीत सांगितले, ‘मला दररोज हजारो कॉल येत होते. माझे कुटुंब आणि मित्र सर्व डेटा गोळा करत होते, त्यात बरेच लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे आम्हाला कळले. म्हणून आम्ही कॉल सेंटर उघडण्याचा विचार केला, १८००१२१३७११ हा एक टोल फ्री क्रमांक आहे. आमच्याकडे एक टीम आहे, जी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.’
एका व्हिडीओत सोनू बसमध्ये बसलेल्या लोकांना कुठे जात आहात, असे विचारले. उत्तर मिळाल्यानंतर तो त्यांना परत नक्की या, असे म्हणाला. स्वतः उभे राहून सोनूने बस सॅनिटाइज करुन घेतली आणि प्रवास करणा-या लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला. सोनूने आतापर्यंत मुंबईहून सुमारे 12000 लोकांना बिहार, झारखंड, कर्नाटक आणि यूपी या राज्यांमध्ये परत पाठवले आहे.