बोर्डी(देवानंद खिरकर): सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुर गावात आज मंगळवारी वन्यजीव वनविभाग अकोटचा मोठा ताफा सागवान लाकडे जप्ती करीता शहानुर गावात सर्च मोहीम राबवित असतांना एका घरासमोरील सागवानी लग्न मंडप जप्त करण्यावरून गावकरी व वनविभागाच्या अधिकारी यांची चागंलीच शाब्दिक बाचाबाची झाल्याने गावातील वातावरण चागंलेच तापले होते. वनविभाग व गावकरी यांच्यातील वाद चिघळण्यापूर्वी अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड वेळीच पोहचल्याने पुढील मोठा संघर्ष टळल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी सकाळी वन्यजीव वनविभागाची एक टिम मोठ्या ताफ्यासह शहानुर गावात न्यायालयीन आदेश घेवुन गावात काही लोकांचा घराची झडती करीता गेली होती. सागवान लाकडे जप्ती करत असतांना एका घरासमोरील सागवानी लग्न मंडप जप्ती वरून वादंग निर्माण झाला होता. अखेर अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी आदिवासी गावकरी व वन्यजीव वनविभाग यांच्यात मध्यस्थी करीत आदिवासी बांधवांची समजुत काढली व वनविभाग द्वारे सर्च मोहीम राबवुन सागवानी लाकडे जप्त करण्यात आली. यावेळी गावकरी व वन्यजीव वनविभागाचे अधिकारी अवारे ,पाटील,चव्हाण व सुनिल वाकोडे तसेच अकोट ग्रामीण ठाणेदार फड प्रहारचे सुशिल पुंडकर रोहित पुंडकर अवि घायसुदंर प्रकाश तायडे सह मोठ्या प्रमाणात गावकरी वनविभाग व पोलीसांचा मोठा ताफा हजर होता.