अकोला,दि.२६ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीजिल्हा प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. हि मोहिम गुरुवार दि.२८ मे ते बुधवार दि.३ जून या कालावधीत अकोला महानगरपालिका हद्दीत राबविली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भविष्यात पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता आजारांचा अधिक फैलाव होण्याआधी ही तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला महानगर्पालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्रासहित सर्व क्षेत्रात युद्धपातळीवर ‘कुटुंबनिहाय सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी मोहिम’ राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवार दि.२८ मे ते बुधवार दि.३ जून या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येईल. या तपासणीत प्रतिबंधित क्षेत्र, झोपडपट्टी क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्राला लागून असलेले क्षेत्र, या व्यतिरिक्त मनपा हद्दीतील क्षेत्र या सर्व ठिकाणी मनपा मार्फत नियुक्त आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी शहराचे चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर,दक्षीण) करुन त्यात वैद्यकीय तपासणी होईल.
तपासणीचे दैनंदिन अहवाल एकत्र संकलित करुन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले जातील. या तपासणीत आढळणारे कोवीड बाधीत, अन्य दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्ती यांची स्वतंत्र यादी करण्यात येईल. त्या त्या भागातील दवाखान्यांना भेटी देऊन दवाखान्यात भरती रुग्णांची माहिती घेणे, फळविक्रेते, भाजी विक्रेत, दुध वितरण करणारे यांची प्राथम्याने तपासणी करण्यात येईल. ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून त्याचे सह अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. तर मनपा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असून अन्य सदस्यांत उपविभागीय अधिकारी अकोला व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे, असे आदेशात नमूद केले आहे.