अकोला,दि.२४- जिल्ह्यात विशेषतः शहरी भागात होत असलेली कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्येतील वाढ ही प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी केलेले सर्वेक्षण तसेच कम्युनिटी क्लिनिक मधून निदर्शनास आलेले सौम्य लक्षणांनी युक्त रुग्ण व पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या केलेल्या चाचण्या यामुळे निदर्शनास येत आहेत, ही वेळीच उपाययोजना होत असल्याने भविष्यातील धोका कमी करणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.
यासंदर्भात डॉ. चव्हाण म्हणाले की, वाढत असलेली रुग्ण संख्या ही संपर्काच्या तपासणीतून होत आहे. आपल्याकडे आढळलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६१ टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणांचे आहेत. हे लोक तपासणी करुन त्यांचे अलगीकरण करण्याचे महत्त्वाचे काम आपण केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार आपण प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण केले शिवाय त्याच भागात कम्युनिटी क्लिनिक्स सुरु करुन त्यातूनही अनेक सौम्य लक्षणांनी युक्त रुग्ण आपल्या निदर्शनास आले . हे रुग्ण त्यांना स्वतःला लक्षणे दिसत नसले तरी ते इतरांना संसर्ग करु शकतात. त्यामुळे हे रुग्ण निदर्शनास येणे व त्यांचे वेळीच अलगीकरण करुन त्यांचेवर उपचार होणे हे महत्त्वाचे काम आपण केले आहे. या शिवाय आपल्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३८२१ जणांचे नमुने घेऊन तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आतापर्यंत २२९ रुग्ण हे बरे झाले असून ९५ रुग्ण हे कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणाखाली आहेत. अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजना ह्या उपाययोजनांमुळे सौम्य लक्षणांच्या रुग्णांद्वारे होऊ शकणारा प्रादुर्भाव कमी करता आला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
‘ई-संजिवनी’ऑनलाईन दवाखान्याचा लाभ घ्या- डॉ. चव्हाण
कोरोना विषाणूला रोखण्याकरीता गर्दी करु नये, अशा सुचना केल्या जात आहेत व त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच आरोग्य विभागाने लोकांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याची सुविधा एका वेबसाईटद्वारे नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप ही प्रचलित आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय दूरसंपर्कसेवेच्या वतीने तसेच www.esanjeevaniopd.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाऊन लोकांना वैद्यकीय सल्ला घेता येणे शक्य होणार आहे. सध्या लॉकडाऊन व सामाजिक अतंर ठेवणे आवश्यक असल्याने या वेबसाईटव्दारे घर बसल्या उपचाराची विनामूल्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये सबंधित रुग्णाला वेबसाईट वर मोबाईल क्रमांकाव्दारे ओ.टी.पी. प्राप्त करुन उपचार बाबत वैद्यकीय तज्ज्ञांव्दारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व जनजागृती करण्याच्या दृष्टीने आरोग्य सेतू अॅप तयार केलेले आहे. गुगल प्ले स्टोअरव्दारे हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन Installation केल्या नंतर त्यामध्ये विविध माहितीचे संकलन केल्यावर कोरोना विषयक माहिती मिळणे शक्य होणार आहे. तसेच या अॅप च्या माध्यमातुन कोवीड आजाराच्या लक्षणांची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.
आरोग्य सेतू ॲप कोरोनाबाधितांच्या संर्पकात आल्य नंतर दक्ष (अर्लट) करण्याचेही काम करते. नागरीकांनी कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात एकजुटीने सहभागी होवून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे व ऑनलाईन ओपीडी करीता www.esanjeevaniopd.in या वेबसाईटचा उपयोग करावा. तसेच (AAROGYA SETU) आरोग्य सेतू ॲप प्रत्येक नागरीकाने मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन वापर करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले आहे.
भरतीया रुग्णालयातील स्वॅब संकलन आज (दि.२५) बंद
सोमवार दि.२५ रोजी ईदच्या दिवशी भरतीया रुग्णालयातील स्वॅब (संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे) संकलन बंद राहील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी कळविले आहे. त्यानंतर ते पुर्ववत कार्यरत होईल, असेही कळविले आहे.