अकोला- जिल्हा स्तरावरील सर्व दैनिक , साप्ताहिक , वृत्तपत्रांची शासनाकडे जिल्हा माहिती अधिकारी मार्फत पाठविलेली , व ३१ मार्च पर्यंत च्या मंजूर झालेल्या जाहिरात बिलांचे पेमेंट तात्काळ सर्व वृत्तपत्रांना देण्यात यावे. कोरोना चे संक्रमण, लॉक डाउन चे काळात अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना, पत्रकारांना शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे. अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.
उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजित दादा पवार, माहिती राज्यमंत्री ना.आदिती ताई तटकरे , माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे, विभागीय उपसंचालक रामकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने आदींना ही या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. लॉक डाउन च्या काळात , कोरोना संक्रमणाच्या परिस्थिती मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून काम करणाऱ्या सर्व प्रिंट/इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना शासनाने आर्थिक मदत करावी. अशी ही मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र संपादक, संचालक, पत्रकार आदींच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मा.अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजूरकर , चिटणीस संजय खांडेकर , चिटणीस दीपक देशपांडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.