कोल्हापूर, दि. २० : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार श्री. माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील पहिले खासदार असतील.
रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नचा विचार दोन दिवसापूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्यांच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती.
‘…मानसिक दुरावा नाही’
घरावरील आपुलकीच गृहाचा लक्ष वेधून घेणारा फलक
• रुकडी येथील खासदार श्री. माने यांच्या घराच्या दरवाज्यावर ‘आपुलकी गृह’ चा फलक लावण्यात आला आहे.
• बांधिलकी आपुलकीची, विलगीकरणातील जिव्हाळ्याची व माणुसकीची.
• नाव प्रथमेश कुमार लोहार, वय-18.
• विलगीकरण कालावधी 11 मे 2020 ते 24 मे 2020
• बाहेरुन आलेले लोक हे आपलेच बांधव, माता-भगिनी व नातेवाईक आहेत. आपणास आजाराशी दोन हात करायचे आहेत. आप्तस्वकीय यांच्याशी नाही.
• सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थ शारीरिक अंतर आहे मानसिक दुरावा नाही.
असा संदेश देणारा हा फलक जाताच क्षणी लक्ष वेधून घेतो.
भाऊबंदकीतील कडवटपणा संपेल, बंधूभाव वाढीस लागेल- खासदार श्री. माने
कोरोनाच्या लढ्यामध्ये संपूर्ण जग उतरलं आहे. अनेकजण आपापल्या पध्दतीने मदत करत आहेत, असे सांगून खासदार धैर्यशील माने म्हणाले, माझी सामाजिक जबाबदारी म्हणून माझे स्वत:चे घर आपुलकी गृह या संकल्पनेला दिले आहे. गावा गावांमध्ये अशी आपुलकीची गृह निर्माण व्हावीत. शासनावर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ताणामुळे काही कमतरता राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसहभागातून गरोदर माता, वडीलधारी मंडळी, लहान मुले, नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणाच्या निमित्ताने अडकलेले आपलेच लोकं असतील, अशांना आपुलकीच्या ओलाव्याची गरज आहे. त्यांना आपुलकी गृहाच्या माध्यमातून आधार आणि आश्रय मिळणार आहे.
गावामध्ये येणारे आपलेच नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी गावागावाने पुढे यावे आणि आपुलकीच्या ओलाव्याचा आधार द्यावा. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्यापासून करा, असे आवाहन करतानाच गावामध्ये भाऊबंदकीत जर काही कडवटपणा असेल तर तोही निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने बंधूभाव वाढीस लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.