अकोला, दि.१९- आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती सुरक्षा, पूरनियंत्रण, साथीचे आजार, आपत्तीत करावे लागणारे तात्पुरते स्थलांतर, आरोग्य यंत्रणा याबाबत नियोजन करतांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घेऊनच नियोजन करावे व आपापल्या यंत्रणांची सज्जता ठेवावी, आगामी काळात शैक्षणिक व अन्य कामांसाठी द्यावे लागणारे दाखले, पिक कर्जांचे वाटप याबाबतही यंत्रणेने सतर्क राहून नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
येथील नियोजन सभागृहात मान्सुन पुर्वतयार आढावा सभा आज पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या सह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, अकोला जिल्ह्यात चार उपविभाग असून सात तालुके व ९९१ गावे आहेत. ग्रामपंचायती ५३० तर नगरपालिका पाच तर नगरपंचायत व महानगरपालिका एक आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे ६९८ मिमी इतके आहे. यंदा सन २०२० मध्ये जुने ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान अपेक्षित सरासरी पर्जन्यमान ६९३.७ मि मी इतके होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे.
जलप्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यात मोठे प्रकल्प दोन आहेत. मध्यम प्रकल्प तीन तर ३३ लघु प्रकल्प असे एकूण ३८ प्रकल्प आहेत.
सद्यस्थितीत मोठ्या दोन प्रकल्पात ४६.१६ टक्के (७७.६८ दलघमी), तीन मध्यम प्रकल्पात ३०.१४ टक्के (२४.७१ दलघमी) ३३ लघु प्रकल्पात २३.७३ टक्के (१९.७९ दलघमी) असा एकूण जिल्ह्यात ३६.६१ टक्के (१२२.१८ दलघमी) जलसाठा उपलब्ध आहे. यंदा ३३३.६९ दलघमी इतका जलसाठा होण्याचा अंदाज आहे.
पूरस्थितीतील व्यवस्थापन
जिल्ह्यातील प्रत्येक गावात पूरनियंत्रण समिती तयार करण्यात आली असून त्यात सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व पोहणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ७७ पूरबाधित गावे आहेत. त्यात अकोला तालुक्यात पूर्णा व मोर्णा या नद्यांच्या काठावरील १२ गावे, बार्शीटाकळी तालुक्यात मोर्णा व काटेपुर्णा नद्यांच्या काठावरील १२ गावे, अकोट तालुक्यात पूर्णा, पठार, खैनदी नद्यांच्या काठावरील १० गावे, तल्हारा तालुक्यात पूर्णा, वान, विद्रुपा, गौतमा या नद्यांच्या काठावरील ११ गावे, बाळापूर तालुक्यात पूर्णा, मोर्णा, वान, मन. मस या नद्यांच्या काठावरील आठ गावे, पातूर तालुक्यात मोर्णा, नर्गुणा, मन नद्यांच्या काठावरील १० तर मुर्तिजापुर तालुक्यात पूर्णा, काटेपुर्णा, उमा, पेढी, निर्गुणा या नद्यांच्या काठावरील १४ असे एकूण ७७ गावे पूरबाधीत होण्याची शक्यता असते. या गावांमध्ये आवश्यकता भासल्यास पक्केबांधकाम असलेल्या शाळांच्या इमारती असून तेथे तात्पुरते निवारा व्यवस्था करण्यात येते. त्यात पुरप्रवण गावांमध्ये ६५ इमारती असून अकोला शहरात ३३ शाळा, अकोट शहरात १० शाळा आणि बाळापूर शहरात पाच पक्केबांधकाम असलेल्या शाळा आहेत. याशिवाय जिल्ह्यात नऊ शासकीय विश्रामगृहे व जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय सभागृहे ५० आहेत. या ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते.
ज्या ज्या ठिकाणी नदी पात्रात असलेले शेती वा घरांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई संबंधित तहसिलदारांनी व जलसंपदा विभागाने करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत.
बचाव शोध यंत्रणा
जिल्ह्यात तहसिलस्तरावर आपत्ती काळात शोध व बचाव साहित्याचे वितरण झालेले असून त्याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यात सर्व तहसिलस्तरावर लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोन बोट, सर्च लाईट एमर्जन्सी लाईट, लाईफ बोया, मेगा फोन, रेस्क्यू ट्रायपॉड, फोल्डींग पंप, हेल्मेट आदी साहित्याची उपलब्धता असल्याचे व ते साहित्य कार्यान्वित असल्याची खातरजमा करण्याबाबत तहसिलदारांना निर्देशीत करण्यात आले. या शिवाय पोलीस व गृहरक्षक दलाकडे असलेल्या साहित्याचाही आढावा घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीकाळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
आपात्कालीन परिस्थितीत संचार व्यवस्था, स्थलांतर व्यवस्था, शोध व बचाव, कायदा व सुव्यवस्था, वैद्यकीय प्रतिसाद , पाणी पुरवठा, मदतकार्य, हेल्पलाईन सुचना, वीज पुरवठा, परीवहन, तसेच जलप्रकल्पाच्या आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण या सर्व यंत्रणांनी आपापल्या सर्व व्यवस्था अद्यावत करुन अहवाल सादर करावा असेही यावेळी निर्देश देण्यात आले. आरोग्य विभागाने साथीच्या रोगांचे उपचार नियोजन करतांना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करावे.
आपत्ती व्यवस्थापन व मान्सून पुर्व सर्व नियोजन हे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही यादृष्टीकोनातून करण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांना व अन्य शासकीय कामांसाठी लोकांना द्याव्या लागणाऱ्या दाखल्यांच्या प्रक्रियेचेही नियोजन करावे अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यात जिथे जिथे कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत त्या रुग्णालयांचा विद्युत पुरवठा कोणत्याही स्थितीत खंडीत होणार नाही याची विज वितरण कंपनीने दखल घ्यावी,असेही यावेळी सांगण्यात आले.
आपत्कालीन स्थितीतील महत्वाचे संपर्क क्रमांक
आपात्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई- ०२२-२२०२५२७४/२२८३७२२५९
मंत्रालय नियंत्रण कक्ष-०२२-२२०२७९९०/२२०२६७१२
एनडीआरएफ पुणे-०२११४-२३१५०९
एसडीआरएफ नागपूर-७५०७७४०४०० विभागीय नियंत्रण कक्ष अमरावती-०७२१-२६६१३६४
जिल्हा नियंत्रण कक्ष-०७२४-२४२४४४४/ टोल फ्री क्रमांक १०७७
पोलीस नियंत्रण कक्ष-१००
आरोग्य सेवा-१०८
अग्निशमन सेवा-१०१