अकोला,दि.१७- कोरोणा विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अंमलात आहे. राज्य शासनाने राज्यातील या लॉकडाऊन कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ केली असून त्यानुसार जिल्ह्यातही वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या कालावधीत मंगळवार दि.१९ (दि.१८ च्या मध्यरात्रीपासून) व बुधवार दि.२० हे दोन दिवस संपुर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि या संचासरबंदीतून अकोट या उपविभागास वगळण्यात आले आहे. उर्वरित लॉक डाऊन कालावधीत जीवनावश्यक सेवा व ज्यांना लॉकडाऊन मधून सुट देण्यात आली आहे त्याबाबी मात्र सकाळी सहा ते दुपारी एक या कालावधीतच सुरु ठेवता येणार आहेत. या लॉकडाऊन मधून कृषि व कृषि संबंधित सेवा संपूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. बॅंकांनीही नियमित वेळेत कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली असून या काळात पिक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जेथे जेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत तेथील निर्बंध मात्र पुर्वीप्रमाणेच कायम राहतील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.