अवर अकोला विशेष : जगभरासह देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि आता ग्रामीण भागात कोरोना वाढतोय. ही लढाई घरात बसून लढावी लागत आहे. मात्र जे योद्धा म्हणून पुढे लढताहेत ते डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिस बांधव पण या जागतिक महामारीमधुन सुटले नाहीत. डॉक्टर्स, नर्सेस, आणि पोलिस या तिघांनाही कोरोनाची बाधा झालीय. आपण जगाचे, देशाचे आकडे मांडण्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचा विचार करु.अकोल्यात आजच्या घडीला कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८६ वर पोहचली आहे.
अकोला शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढता आहे. हा कोरोनाचा आकडा वाढतच आहे. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला तर १११ जण उपचार घेत आहेत. ” कोरोना वॉरियर्स” पदवी देवून, टाळ्या , थाळ्या , दिवे लावून आणि फुलांची उधळण करून आपण कोरोना योद्धा चे आभार मानतोय. लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात हे प्रयोग करुन झाले मात्र त्या पोलिसांच्या कुटुंबाचे काय? कर्तव्य बजावण्यासाठी घर संसार सोडून पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभारून कोरोनाशी दोन हात करत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीमुळे सगळेच बंद आहे. चहा, नाश्ता जेवण सोडा पाणी देखिल मिळणे कठीण झाले आहे. रसद संपली की लढाई देखिल संपते हा इतिहास आहे. भर उन्हात कुठल्यातरी झाडाच्या सावलीला, छोट्या मंडपात उभे हे वॉरियर्स लढत आहेत.
नाकाबंदी करताना कोण,कुठून,कशासाठी आलाय. त्याला परवानगी आहे का? याची चौकशी करण्यासाठी तो पुढे जातोय. कारण त्याच्या हद्दीत कोरोना नाही आला पाहिजे यासाठी. यावेळी काही समाजकंटक विचारणा केली, माहिती विचारली म्हणून पोलिसांवरच हल्ले करत आहेत. तरीपण ते लढत आहेत. उलटे आपल्यालाच हात जोडून विनंती करताहेत. की बाबा घरीच बस. तुझे कुटुंब सुरक्षित ठेव आणि तुही सुरक्षित रहा. विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर कारवाई करुन झाली, विद्यार्थ्यांना द्यावी अशी शिक्षा देवून झाली. गुलाब फुलं दिली, आरती केली, अंभग गायिले. पण आम्ही काय सुधरलो नाही.
आज एक पोलिस कोरोना बाधित झाला. लॉकडाऊन पुर्वी काही कर्मचाऱ्यांची बदली झाली. मुलांच्या शाळा सुरु असल्याने त्यांनी बिऱ्हाड हलवले नाही. बदलीच्या ठिकाणी एकटेच गेले. मात्र लॉकडाऊन नंतर पोटाला दोन घास मिळणे मुश्किल झाले. सुट्टी नाही ना रजा त्यामुळे मुलाबाळांची भेट नाही. घरी वृध्द आई-वडील आजारी असतील तर त्यांचे औषधोपचार करण्यासाठी देखिल येवू शकत नाहीत कारण पुढे धोका आहे आणि हा धोका कुटुंबाला देखिल होवू शकतो हे माहिती असताना तो लढतोय. आज ५५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना घरी बसवून एक चांगला निर्णय सरकारने घेतलाय. त्याच प्रमाणे ज्या पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंब आहेत त्याच गावात त्यांना ड्युटी देण्याचा आदेश सरकारने काढावा. शेवटी मुलाबाळांमध्ये असले की लढण्यासाठी मानसिक बळ जास्त मिळते.हे तेवढेच खरे आहे अखेर सलाम त्या कोरोना योद्धाना…..