मुंबई : मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच आणि ज्याच्याकडे दारु खरेदीचा परवाना आहे अशा ग्राहकासच देण्यात आली आहे. म्हणजे जो विक्री करतो तो दुकानदार आणि जो खरेदी करतो तो ग्राहक या दोघांकडे परवाना हवा. राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे
लॉकडाऊनदरम्यान राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. मात्र, मद्यविक्री दुकांनांबाहेर प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे अखेर राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने यासाठी काही शर्ती ठेवल्या आहेत.
राज्य सरकारने परिपत्रकात जारी केलेल्या शर्ती
1. परवाना असलेल्या विक्रेत्यांना दारु विक्री करता येणार आहे.
2. दुकानदारांना ऑर्डरशिवाय दारु विक्री करता येणार नाही.
3. परवानाधारक ग्राहकाने ऑर्डर केल्यावरच परवानाधारक विक्रेता दारुची होम डिलिव्हरी करु शकतो.
4. निश्चित दिवशी आणि वेळी दारु घरपोच देता येईल.
5. घरपोच दारु घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा. त्या व्यक्तीने जवळ सॅनिटायझर ठेवावं आणि वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा.
6. सरकार कधीही हे नियम रद्द करु शकते.
7. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत हे नियम पाळणं बंधनकारक असेल.
दरम्यान, लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
लॉकडाऊनमुळे दारुच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने या संधीचा फायदा घेत दारुवर 70 टक्के विशेष कोरोना टॅक्स लावला आहे.
भारतात दारुची होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणताही कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात दारु पिण्यासाठीवेगळा कायदा आहे. पण घरपोच दारु संबंधित राज्य सरकारने कायदा करावा, असं मत उद्योग संघटना इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसीएशन ऑफ इंडिया (ISWAI) च्या संबंधित सदस्यांनी मांडले होते.
“सरकारने राज्याला घरोघरी दारु पोच करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनमध्ये राज्यातील महसूल वाढेल”, असं मत ISWAI चे कार्यकारी अध्यक्ष अमृत सिंह यांनी व्यक्त केले होते.
“जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने दारुची डिलिव्हरी केली जाऊ शकते. तर दारु विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकते. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी आम्ही दारु घरपोच देण्याचा विचार करत आहे”, असं झोमॅटोचे सीईओ मोहित गुप्ता यांनी सांगितले होते. त्यानंतर अखेर राज्य सरकारने मद्याच्या होम डिलिव्हरीस परवानगी दिली.