अकोला,दि.७ राज्यातील अन्य जिल्ह्यात असणाऱ्या व आता अकोल्यात येऊ इच्छिणाऱ्या २८० जणांना जिल्हा प्रशासनाने ना- हरकत प्रमाणपत्र तर अकोल्यातून बाहेर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या १५९० जणांना ऑनलाईन पद्धतीने ई- पास दिले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात अडकलेले व आपापल्या राज्यात वा जिल्ह्यात जाऊ इच्छिणारे तसेच राज्यांतर्गत बाहेरील जिल्ह्यात अडकलेले व परराज्यात अडकलेले अशा लोकांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात वा देशातील अन्य राज्यातील जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://covid19.mhpolice.in/ या लिंक वर माहिती भरावी. (Upload Your Aadhar Card and Medical Certificate in Single file)वैद्यकीय तपासणी अहवाल लावणे अनिवार्य आहे. ही माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधण्यात येईल आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी दिलेल्या लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे. अधिक माहीतीसाठी ०७२४-२४२४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
दरम्यान बाहेरील जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात येण्यासाठी ११ जिल्ह्यातून २८० जणांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्या सगळ्यांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाने जारी केली आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातून राज्यातील अन्य जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्या १५९० व्यक्तिंना ई- पासेस देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली आहे.