अकोला,दि.६- आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे १०० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९३ अहवाल निगेटीव्ह तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ८२ झाली असून प्रत्यक्षात ५७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, दरम्यान गेले महिनाभर उपचार घेणाऱ्या तीन वर्षीय बालकास आज पुर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ११२० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १०३९ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ९५७ अहवाल निगेटीव्ह तर ८२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ८१ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ११२० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९२३, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८४५ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९५७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ८२ आहेत. तर आज अखेर ८१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज प्राप्त झालेल्या १०० अहवालात ९३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
तीन वर्षीय बालकास घरी सोडले
आज सायंकाळी गेले महिनाभर उपचार घेऊन पुर्ण बरा झालेल्या एका तीन वर्षीय बालकास घरी सोडण्यात आले. हा बालक दि. ७ एप्रिल रोजी दाखल झाला होता. हा बैदपुरा येथील रहिवासी आहे. आज तब्बल महिना भराच्या उपचारानंतर त्यास घरी सोडण्यात आले. आता ह्या बालकास १४ दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे.
चार जणांचे मृत्यू
दरम्यान आज चार जणांच्या मृत्यूंचा कोरोना बाधीतांच्या अहवालात समावेश झाला. त्यातील एक रुग्ण हा उपचार घेतांना आज सकाळी मयत झाला. हा रुग्ण खंगनपुरा भागातील ६५ वर्षीय पुरुष होता . त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. हा रुग्ण दि.२ मे रोजी दाखल झाला होता. काल दि.५ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
तसेच दि. ३ रोजी दाखल ७७ वर्षीय महिला ही काल दि. ५ रोजी मयत झाली. तिचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. तो आज प्राप्त झाला.
तर अन्य एक ६५ वर्षीय महिला देखील दि.३ रोजी दाखल झाली होती. तिचाही मृत्यू काल दि. ५ रोजी झाला. परंतू तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तो आज प्राप्त झाला.
तसेच एक ७० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत दि. ४ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवालही आज प्राप्त झाला तो पॉझिटीव्ह आला. हा इसम दानाबाजार येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली.
आता ५७ जणांवर उपचार
आता सद्यस्थितीत ८२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील अकरा जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर आज (बुधवार दि.६ मे ) एकास असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ५७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान आजअखेर ९९५ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ४५८ गृहअलगीकरणात व ९७ संस्थागत अलगीकरणात असे ५५५ जण अलगीकरणात आहेत. तर ३४२ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ९८ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.