अकोला,दि.६– जिल्ह्यात सीसीआय ने कापूस खरेदीचा वेग वाढवावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमावे. मात्र कुठल्याही परिस्थितीत येत्या ३१ मे पर्यंत कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज दिले.
कापुस खरेदी प्रक्रियेच्या वेगाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत तात्काळ सीसीआयच्या अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आ. रणधीर सावरकर, सीसीआयचे अजयकुमार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, विजय अग्रवाल तसेच कापूस खरेदी संघाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, आतापर्यंत सीसीआय कडे कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची ही संख्या पाहता व खरेदीचा वेग पाहता, लवकर खरेदी प्रक्रिया पावसाळ्यापुर्वी आटोपणे आवश्यक आहे. त्यासाठी सीसीआय मार्फत ग्रेडर संख्या कमी असल्याची अडचण सांगण्यात आली. त्यावर शेजारच्या भागातून कर्मचारी वर्ग मागवून खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवावा. येणाऱ्या काळार्तील पावसाळा तसेच शेतीची करावयाची कामे लक्षात घेता तात्काळ मनुष्यबळाचे नियोजन करुन ही खरेदी ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे असे निर्देश ना. धोत्रे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी पापळकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, सीसीआयचे अजयकुमार यांनी सहभाग घेतला.
हेही वाचा : स्थलांतरीत आदिवासी मजूरांच्या मदतीसाठी प्रकल्प कार्यालयात स्वतंत्र कक्ष