बार्शीटाकळी: तालुक्यातील दगड पारवा येथील विदृपा प्रकल्पाचे दोन गेट रविवारी (ता.26) सकाळी10:30 वाजता दरम्यान उघडल्याने विदृपा नदीला पूर आला. त्यामुळे नदी काठच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला होता
प्राप्त माहितीनूसार रविवारी कोणतीही पूर्व सूचना न देता धरणाचे दोन गेट उघडल्याने नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. नदी काठी असणारी गावं, बार्शीटाकळी, आळंदा, कान्हेरी, खडकी चांदुर येथील शेतातून येणारे मजूर नदी काठावर अडकले. पिंपळखुट्याला जाणाऱ्या रस्त्यामधील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संर्पक तुटला. नागरिक नदी काठी उभे राहुन पुराचे पाणी उतरण्याची वाट पाहू लागले. अचानक पणे नदीला आलेल्या पुरात बैल, गाय, बकऱ्या काही अतंरापर्यंत वाहुन गेल्यात. मात्र, त्या काठावर आल्याने त्यांचा जीव वाचला. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही. लॉकडाउनच्या काळात काम धंदे व मजुरी बंद असल्याने आधीच शेतकरी अडचणीत आहे. तर, शेतातील झालेल्या नुकसानाने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येते.