मुंबई : लॉकडाऊनमधील बंधने आता हळूहळू शिथिल केली जात असून, रविवारपासून जीवनावश्यक वस्तूंखेरीज अन्य दुकाने काही अटींवर उघडण्याची मुभा केंद्र सरकारने दिली असली, तरी राज्य सरकारने मात्र तसे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता सध्या तरी अशी परवानगी देता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापार्यांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्याचा असून, आम्ही अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे टोपे यांनी सांगितले. आपल्याकडची परिस्थिती पाहता दुकाने सुरू करता येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, त्याचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, केंद्र सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा काढलेल्या एका आदेशामुळे महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील निवासी भागातील दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे व्यापारीवर्गात समाधान व्यक्त होत असताना, महाराष्ट्रात याबाबत तातडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्वाधिकार राज्याला : टोपे
केंद्र सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायची की नाही, यावर अद्याप विचार सुरू आहे. याबद्दलचा सर्वाधिकार राज्याचा आहे, असे टोपे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी दुकाने उघडणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात काही दुकानांना सशर्त परवानगी
महाराष्ट्र सरकारने आधीच राज्यातील कंटेनमेंट झोन नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, गर्दी कमी होत नसल्याने तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई, पुण्यातील सवलत अवघ्या एका दिवसात रद्द करण्यात आली होती. या दोन्ही शहरांत मान्सूनपूर्व कामे करण्यास तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि पंख्याची तसेच पुस्तकांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणार्या सेवा, बेकरी, दूध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
घरगुती उपकरणांची दुरुस्ती करणार्या लोकांनाही काम करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती. आता अन्य दुकानांनाही परवानगी देणारा आदेश गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा काढला. मात्र, केंद्राचा हा आदेश राज्य सरकारने नाकारला असून, सध्या तरी दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचा आदेश
या आदेशानुसार, देशात आजपासून काही व्यापारी व्यवहार सुरू होऊ शकतात. नगरपरिषद आणि महापालिका क्षेत्रातील निवासी कॉलनीच्या जवळ असलेली स्टँड अलोन (एकेकटी) दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गृह मंत्रालयाने त्यासाठी काही अटीही लागू केल्या आहेत. या दुकानांमध्ये निम्माच कर्मचारीवर्ग असेल आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागतील. शिवाय, सॅनिटायझरची सोय असेल. जी दुकाने शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्टखाली नोंदणीकृत आहेत अशांनाच ही परवानगी देण्यात आली आहे.
दारूची दुकाने बंदच!
वाईन, बीअर शॉप हे शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये येत असले, तरीही केंद्र सरकारने या दुकानांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवले असून, ही दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही स्वयंपाक करायला शिकलात? घरच्या घरी कटिंग, दाढी करताय? चांगली गोष्ट आहे… ही सारी कौशल्ये तुम्हाला आता आणखी काही काळ उपयोगी पडतील. कारण केंद्राच्या नव्या आदेशानुसारही सलून्स, हॉटेल्स बंदच राहणार आहेत.
शहरातील मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्समधील दुकाने बंद राहतील.
शहरातील एकास एक लागून असलेली बाजारपेठेतील दुकाने उघडता येणार नाहीत.
दारूची कोणतीही दुकाने उघडण्यास बंदी.
ग्रामीण भागातील मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉलमधील दुकाने बंद.
कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमधील दुकानेदेखील उघडण्यास परवानगी नाही.
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील मल्टी-ब्रँड आणि सिंगल मल्टी-ब्रँडची दुकाने उघडणार नाहीत.
सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, थीम पार्क, थिएटर, बार, विविध प्रकारचे क्लब बंद राहतील.
सलून आणि ब्युटीपार्लर्सदेखील बंद राहतील.
तंबाखू, गुटख्याची दुकाने देखील बंद
विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांसारख्या सेलिब्रिटिंनाही घरीच केस कापावे लागले. आता आणखी काही काळ सलून्स बंदच राहणार आहेत.