अकोला- कोरोना या संकटाचा सामना आपण सारेच करत आहोत. हा सामना करत असतांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे समन्वयाने व सहकार्याने काम करीत आहेत ही समाधानाची बाब आहे. या समन्वयातूनच त्यांनी लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज येथील आढावा बैठकीत केले.
कोरोना संसर्ग उपाययोजनांबाबत अकोला जिल्ह्याचा आढावा ना. देशमुख यांनी आज घेतला. येथील जिल्हा नियोजन सभागृहात सामाजिक अंतर राखत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, तसेच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी ना. देशमुख यांनी लोकप्रतिनिधींना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी आपल्या सुचना सांगाव्या असे आवाहन केले. यावेळी आ. शर्मा यांनी एक मे पासून होणाऱ्या धान्य वितरणाची वाट न पाहता येत्या २६ तारखेला असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या आत गोरगरिबांना धान्य वाटप करा,अशी सुचना केली. तर आ. पिंपळे यांनी शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी दिलासा द्यावा, अशी सुचना केली. त्यावर शेतमालाच्या वाहतुकीला कोणतीही अडचण नाही,असे ना. देशमुख यांनी स्पष्ट केले. आ. सावरकर यांनी वैद्यकीयदृष्ट्या तातडीच्या वाहतुकीच्या प्रवासाच्या परवानगी लवकर मिळण्याबाबत उपाययोजना करावी असे मत मांडले. यावेळी आ. बाजोरिया यांनीहि आपल्या सुचना मांडल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संदर्भात स्थितीचा आढावा सादर केला. त्यानुसार, जिल्ह्यात सध्या कोविड बाधीत रुग्णसंख्या १६ असून त्यात दोन जण मयत झाले आहेत. उर्वरित १४ पैकी तीन जण पॉझिटीव्ह असून उर्वरित ११ जण हे दुसऱ्या तपासणी अखेर निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर आणि अकोला शहरातील बैदपूरा व अकोट फैल या चार भागातच रुग्ण आढळले असून उर्वरित भागात रुग्ण नाहीत. शिवाय हे भागही आता प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या भागात तब्बल १५० पथकांनी १४६०० घरांमधील व्यक्तींची घरोघर जाऊन तपासणी करुन या सर्वेक्षणाअंती २६६ जण संशयित रुग्ण म्हणून सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोवीड नमुने तपासण्यासाठीची प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यामुळे आता नमुने तपासणीचे काम वेगाने होत आहे. जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारासाठी ३८२ बेड ची विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे १७५० बेडचे विलगीकरण कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेकडे सध्या ७५० पीपीई किट, ५५०० एन ९५ मास्क, तसेच ३०००० ट्रिपलेट मास्क उपलब्ध आहेत, सर्व तऱ्हेच्या आवश्यक औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यात परप्रांतीय स्थलांतरीत मजूर २०४८ असून ते २५ निवारा शिबिरांमध्ये सुरक्षित आहेत. त्यांना वैद्यकीय तपासणीसह जेवण, नाश्ता सारख्या सुविधा दिल्या जात आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातील नागरिक जे परप्रांतांत अडकले आहेत त्यांचीही माहिती जिल्हाप्रशासनाकडे आहे असे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील गोरगरिबांना रेशनकार्ड असो वा नसो त्यांना धान्य मिळावे यासाठी जिल्ह्याच्या स्थानिक उत्पन्नाचा हिस्सा त्यासाठी खर्च करता येईल असे ना. देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील अन्न धान्याची उपलब्धता, भाजीपाला पिकांची उपलब्धता, बाहेर जाणारा शेतीमाल याबाबत माहिती देण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी १३ मार्च पासून जिल्ह्यात विविध प्रकारचे ३५ आदेश जारी केले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल हा देशातील कोणत्याही भागात वाहतुक करुन नेण्यास मुभा असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले.
प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे कौतूक करुन ना. देशमुख यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सुचनांचे स्वागत केले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे व लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन केले. तसेच जनतेने लॉक डाऊन कालावधीत घरात राहून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
अधिक वाचा: पत्रपरिषद :कोरोनाबाबत खबरदारी म्हणून राज्यातील सहा कारागृह लॉक डाऊन-गृहमंत्री ना. अनिल देशमुख