अकोला (जिमाका)- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सहा कारागृह खबरदारीचा उपाय म्हणून लॉक डाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पालघर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून याघटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने सुरु केली आहे. शिवाय पोलीस चौकशी दरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.
कोरोना सद्यस्थितीबाबत अकोला जिल्ह्याचा आज ना. देशमुख यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर उपस्थित होते.
सहा तुरुंगांचे लॉक डाऊन
यावेळी ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात सहा ठिकाणचे तुरुंग क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने हे तुरुंग लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही, असे ना. देशमुख यांनी स्पष्ट केले.
संचारबंदीचे कडक पालन
यावेळी ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात संचारबंदीचे कडक पालन व्हावे यावर शासनाने भर दिला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून ५७ हजार ५१७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून क्वारंटाईन केले असतांनाही बाहेर फिरतांना आढळले म्हणून ५७२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांचा १०० या क्रमांकावर आतापर्यंत ७४ हजार ३४४ कॉल या कालावधीत आले असून त्यांना मदत करण्यात आली आहे. अत्यावश्यक आवागमनासाठी आतापर्यंत दोन लाख १७ हजार पासेस देण्यात आले. तर अवैधरित्या वाहतुक केल्याप्रकरणी १०५१ गुन्हे दाखल झाले आहेत. अकारण संचारबंदीचे आदेश मोडून बाहेर फिरणाऱ्या ४० हजार ४१४ गुन्हे दाखल झाले असून आता तर त्यांचे वाहन ही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही ना. देशमुख यांनी सांगितले.
फेक न्यूजबाबत कडक धोरण
सोशल मिडीयातून प्रसारित संदेशाद्वारे सामाजिक वातावरण खराब केल्याप्रकरणी २४२ गुन्हे दाखल झाले आहेत. फेक न्यूजबद्दल राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले असल्याचे सांगून असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत असे ना. देशमुख यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात तब्लिगीचा कार्यक्रम शासनाने धोका ओळखून रद्द करायला लावला. राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु
पालघर येथे झालेली घटना ही दुर्दैवी असून अफवा पसरल्याने विनापरवानगी दुसऱ्या राज्यातून आलेल्या दोघांवर जमावाने हल्ला केला. यावेळी तेथे पोलीस संख्याबळाने कमी होते. नंतर जादा कुमक गेली. पोलीसांनी जमावाला पांगवण्याची कारवाई केली असल्याची माहिती ना. देशमुख यांनी दिली. सध्या या प्रकरणी सुमारे १०० जणांना अटक करण्यात आली आहे. उच्चस्तरीय चौकशीस सुरुवातही झाली असुन अहवाल येताच त्यावर कारवाई होईल, असेही ना. देशमुख यांनी स्पष्ट केले.
वृत्तपत्र वितरणाबाबत समिक्षेनंतर निर्णय
वृत्तपत्र वितरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केवळ घरोघर वाटप करण्यावर बंदी आहे. तथापि, स्टॉल्सवर विक्री करण्यास बंदी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच या मार्गदर्शक सुचनेची वरिष्ठ पातळीवर समिक्षा करुन निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.