अकोला- लॉकडाऊन कालावधीमुळे बांधकाम कामगारांना आपदग्रस्तस्थितीत अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याबाबत काही लोक सोशल मिडियातून अफवा फैलावत आहेत. तसेच असे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी कामगारांकडून काही शुल्क व कागदपत्रेही गोळा करीत आहेत. मात्र शासनाने वा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही,असे सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाणे यांनी स्पष्ट केले असून कामगारांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहनही केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना लॉकडाऊन असणाऱ्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आपद्ग्रस्त स्थितीत अर्थसहाय्य राज्य शासन व महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, मुंबई कडुन देण्यात येणार असल्याचे संदेश सोशल मिडियाच्या माध्यमेतुन शहरातील काही कामगार संघटना अफवा पसरविण्याचे काम करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. तथापि, असंघटीत बांधकाम कामगारांना कोणतेही अर्थसहाय्य देण्याची सुचना वा घोषणा राज्यशासन व मंडळाकडुन करण्यात आलेली नसून काही कामगार संघटनांच्या वतीने कामगारांना भुलथापा दिल्या जात असल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात अशा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी कामगारांना आपद्ग्रस्त अर्थसहाय्य मिळावे यासाठी प्रयत्न करुन थेट कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्य निधी जमा होईल, याकरीता संघटनेच्या वतीने कामगारांकडुन कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत बांधकाम कामगारांकरीता कोणत्याही अर्थसहाय्य योजनेची (संचारबंदी काळात) घोषणा व सुचना कामगार विभागाला प्राप्त झालेले नाही. तरी कामगारांनी अशा भुलथापांना बळी पडू नये. या संदर्भात भुलथापा देऊन कागदपत्रासह पैश्याची मागणी होत असल्यामुळे कामगारांची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व बांधकाम कामगारांनी राज्य शासनाकडुन आपद्ग्रस्त स्थितीत सामोरे ठेवुन घोषणा होईपर्यत कामगारांनी कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नये व स्वत:ची फसवणुक टाळावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजु.दे.गुल्हाने, यांनी केले आहे.
अधिक वाचा: बाळापूर पंचायत समिती सभापती यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप