अकोला,दि.१५ – कोरोना विषाणू संसर्गाला सर्वाधिक बळी पडण्याची शक्यता ही ज्येष्ठ नागरिकांची असते. त्यातही जर त्यांना पुर्वीच्या आजारांचा दीर्घ इतिहास असेल तर ही शक्यता अधिक होते बळावते. त्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व नवी दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थान दिल्ली यांनी काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्या याप्रमाणे-
काय कराल?
· शक्यतो पूर्णवेळ घरातच रहा.
· आगंतुकांना भेटणे टाळा, आवश्यकता भासल्यास किमान एक मिटरचे अंतर राखा.
· एकटेच रहात असाल तर शेजाऱ्यांच्या संपर्कात रहा.
· कोणत्याही प्रकारचे एकत्रिकरण टाळा.
· घरातल्या घरात सक्रिय रहा ,हलके व्यायाम, योगासने करा.
· जेवणा आधी , जेवणानंतर, स्वच्छतागृहातून आल्यानंतर किमान २० सेकंद साबणाने स्वच्छ हात धुवा.
· वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तू उदा. चष्मा, मोबाईल इ. सतत स्वच्छ करा.
· शिंकताना, खोकतांना नाका तोंडावर हातरुमाल अथवा टिश्युपेपर धरा. वापरलेला टिश्युपेपर बंद कचरा पेटीत टाका. वापरलेला हातरुमाल साबणाने धुवा.
· घरी बनवलेले ताजे, गरम, पौष्टीक अन्न खा, भरपूर पाणी प्या, फळांचे रस प्या.
· आपल्या आजारांची पूर्वीपासून सुरु असलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित घेत रहा.
· स्वतःच्या तब्येतीत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन नोंद ठेवा.
· ताप,सर्दी, खोकला येत असल्यास श्वास घेण्यास अडचण येत असल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रास भेट द्या.
· आपण सोबत रहात नसलेल्या नातेवाईकांशी दूरध्वनीवरुन संपर्कात रहा.
· सर्दी, खोकला, ताप इ. लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.
· हस्तांदोलन, अलिंगन टाळा.
· स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा.
· दवाखान्यात वारंवार जाण्याऐवजी दूरसंभाषण करुन डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.
· सतत अंथरुणात झोपून राहू नका.
वयोवृद्धांची काळजी घेणाऱ्या लोकांनी घ्यावयाची काळजी
· वृद्धांना मदत करण्याआधी स्वतःचे हात धुवा.
· वृद्धांच्या संपर्कात असाल तेव्हा नाक, तोंड पुरेसे झाकलेले असावे.
· वृद्धांनी वेळेवर व पुरेसे जेवण , पुरेसे पाणी पिण्याबाबत खात्री करा. त्यांच्या तब्येतीचे निरिक्षण करा.