अकोला- कृषी विभाग, भारत सरकार यांच्यावतीने नाशवंत – भाजीपाला व फळे, शेतीविषयक निविष्ठा जसे की बियाणे, कीटकनाशके आणि खत इत्यादींच्या आंतर-राज्य वाहतुकीसाठी अखिल भारतीय कृषि परिवहन कॉल सेंटर सुरू केले आहे. या कॉल सेंटर चे क्रमांक टोल फ्री असून ते याप्रमाणे आहेत.
१८००१८०४२०० आणि १४४८८ .
या दोनही क्रमांकांवर कोणत्याही मोबाइल किंवा लँडलाईन फोनवरुन या नंबरवर कॉल करता येईल. या क्रमांकावर शेतीमालाची वाहतुक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, व्यापारी, किरकोळ विक्रेते, ट्रान्सपोर्टर किंवा इतर कोणत्याही भागधारक ज्यांना शेतमालाच्या आंतरराज्यीय दळणवळणात अडचणी येत आहेत, त्यांना या क्रमांकावर संपर्क साधून मदत व मार्गदर्शन मिळू शकेल. कॉल सेंटरचे कार्यकारी अधिकारी आवश्यक असलेल्या मदतीसह वाहन व मालचा तपशील राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठवतील,असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी कळविले आहे.
कृषी निविष्ठा साठेबाजी, दरवाढ करणाऱ्यांचे
परवाने रद्द करण्याचे कृषी आयुक्तालयाचे निर्देश
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर बियाणे, खते, किटकनाशके उत्पादक, विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालय पुणे यांनी निर्देश दिले आहेत. तथापि, खरिप हंगाम जवळ येत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांची आवश्यक तितकी व योग्य दरात उपलब्धता होईल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार कृषि निविष्ठांची साठेबाजी करणे, जादा दराने विक्री करणे यासारखे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करुन परवाने निलंबित करणे अथवा रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिला आहे.