अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणातील अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या 2 आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी आकोट न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोनही आरोपींची २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली. तर 3 आरोपींची यापूर्वी च 22 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहत मध्ये तुषार पुंडकर यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार फुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांना या प्रकरणात तपास करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती. अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना 26 मार्च रोजी अटक केली. या आरोपींना चार एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असतानाच तपासादरम्यान या प्रकरणात निखील सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर निखील सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे सोमवार 13 एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर तीन आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयाने यापूर्वी च कारागृहात रवाणगी केली.