तेल्हारा: (विशाल नांदोकार) राज्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन प्रथम टप्प्यात 14 एप्रिल पर्यंत गेले. अशातच शासनाने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती ती आता प्रत्यक्षात अमलात आली असून तेल्हारा तालुक्यात धान्य वाटपाचा मुहूर्त साधण्यात आला आहे. परंतु एकाच वेळी सर्वांना धान्य मिळत असल्यामुळे धान्य दुकानावर गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाचा फज्जा उडवल्या जात आहे. मात्र या धान्य वाटपामुळे गरजू गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.
मार्च महिन्यात कोरोणाचा प्रसार झाल्यानंतर लगेच लॉकडाऊनला सुरुवात झाली, त्यामुळे प्रशासनाने युद्धस्तरावर प्रतिबंध करण्यासाठी योजना आखल्या. एप्रिल महिन्याचे रेशन मार्च महिन्यातच प्रत्येक गावापर्यंत पोचवण्यात आले. दरम्यान एप्रिल मे व जून या तीन महिन्याचे रेशन लाभार्थ्यांना एकत्रितपणे मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातच रेशन कार्ड वरील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदूळ देण्याचीही घोषणा झाली.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी जेव्हा लाभार्थी रेशन दुकानात रेशन घेण्याकरिता गेली असता त्यांना नेहमीप्रमाणेच धान्य मिळाली. तीन महिन्याची एकत्रित रेशन न मिळता केवळ एप्रिल महिन्याचे राशन देण्यात आले. त्यात लाभार्थ्यांना गहू तांदूळ व्यतिरिक्त दाळ साखर मिळते. त्यात डाळ साखरेलाही या महिन्यात खो देण्यात आला आहे. वास्तविक पाहता लॉकडाऊन नसताना रेशनच्या लाभार्थ्यांना दुकानातून हवे तसे धान्ये व डाळी प्राप्त झाल्या. मात्र, लॉकडाऊनच्या अत्यावश्यक काळात ग्रामीण जनतेला डाळ साखर यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील जनता लॉकडाऊनमुळे होरपळून निघाली आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे कामधंदे पूर्णतः ठप्प झाले आहेत. ग्रामीण जनता सकाळ व संध्याकाळी केवळ ओट्यावर बसून गप्पा ठोकत आहेत. सध्या उन्हाळ्याचा मोसम आहे या काळात शेतीतील सर्व कामे आटोपली आहेत मजुरांच्या हाताला ही कोणतेच काम उरले नाही.
त्यामुळे मजूरही आता हात चोळत बसले आहेत. दरम्यान ७ एप्रिल पासून तेल्हारा शहर व तालुक्यातील गावागावात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत धान्य वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गोरगरिबांना मध्ये समाधानाचे वारे वाहू लागले आहेत. परंतु शासनामार्फत ज्या गोरगरिबांना विविध योजनेअंतर्गत दरमहा मानधन मिळते ते मानधन अनेकांना अद्याप पर्यंत मिळाले नाही. आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर अनेकांनी आपल्या गावातील दुकानदारांकडून किराणा उधारीवर घेतला आहे. परंतु अद्यापही अनेकांच्या खात्यात सदर रक्कम पडली नसल्याचा आक्रोश सुरू आहे. आणि वृद्ध हे आपल्या बँकांमध्ये सध्या जाऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत या गरिबांना नगदी पैशांची चणचण भासू लागत आहे.
तहसील कार्यालयाने या गंभीर बाबीची नोंद घेऊन गोरगरिबांच्या खात्यात विनाविलंब निधी पाठविण्याची गरज आहे. विधवा, अपंग, वृद्ध हे सर्वजण सध्या पैसे केव्हा मिळणार या प्रतीक्षेत आहेत. सध्या ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. सध्या नगदी पैसे कोणी उदार द्यायला तयार नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसू लागली आहे. या वास्तविक परिस्थितीचा विचार करता सर्व शहरांमध्ये तसेच तालुक्यामध्ये गोरगरिबांना आवश्यक असलेले धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे.