अकोला- जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आजपासून चला चूल पेटवू या सेवा अभियानाची सुरुवात केली आहे. हनुमान जयंती, दि. ११ रोजी महात्मा फुले जयंती, दि.१४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे उत्सवी स्वरुप टाळून हे अभियान केवळ सेवा कार्यातून राबवावयाचे आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी लॉक डाऊन मुळे गोरगरिबांची सेवा करण्याचे आवाहन ना. कडू यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यासाठी समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी घरी राहून आपल्या जवळपासच्या गरीब कुटूंबांना गरजुंना शिजवलेले अन्न किंवा ते शक्य नसेल तर अन्न धान्य द्यावे. किमान २०० ते ५०० रुपये देऊन आर्थिक मदत करावी. ही सेवा केवळ स्वतः च्या खर्चातून करावयाची आहे. त्यासाठी कोणीही एकत्र येण्याची गरज नाही. कोणाकडून वर्गणी गोळा करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केलेल्या सेवेची माहिती ७३५००८७२२७ यानंबर वर व्हॉट्स ॲप वा एसएमएस द्वारे कळवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.जे कार्यकर्ते उत्कृष्ट सेवा करतील त्यांना सर्वोत्तम कोरोनामुक्त कार्यकर्त्या घोषित केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.