अकोला- कोविड १९ च्या उद्रेक व प्रसार कालावधीत रब्बी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. बाजारपेठेतील हालचालीसह उत्पादनाची काढणी व हाताळणी करणे अपरिहार्य आहे. कारण शेतीची कामे वेळेवर झाली पाहिजेत. तसेच किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच सामाजिक स्वच्छता व सुरक्षितेच्या खबरदारीच्याउपाययोजनांचे पालन केले पाहिजे. या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात स्वच्छ धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे, फेस मास्क परिधान करणे, संरक्षक कपडे आणि उपकरणे व यंत्रसामग्री स्वच्छ करणे या बाबींचा समावेश होतो. शेतावर काम करणाऱ्या लोकांसोबतच सर्वांनी हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने रब्बी हंगामातील पिकांची काढणी, मळणी व तत्पश्चात करावयाचे व्यवस्थापन याबाबतचा सल्ला कृषि आयुक्तालय पुणे यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
पिकांची काढणी व मळणी
१. गहू पिकाची काढणी जवळपास पूर्ण होत आली असून त्यासाठी मोठे गहू कापणीयंत्र राज्यामध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या यंत्रांची दुरुस्ती,देखभाल करण्याऱ्या व हाताळणाऱ्या कामगारांनी तसेच शेतकरी/शेतमंजुर व त्याचे कुटूंबातील सदस्य यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे.
२. मसूर, मका आणि मिरची पिकाची काढणी सुरु असून आणि हरभरा पिकाची अंतिम टप्प्यात आहे.
३. फळ पिकांमध्ये आंबा, द्राक्ष, केळी तसेच भाजीपाला पिकांसह सर्व पिकांची काढणी/मळणी करण्यासाठीच्या कामावर असलेल्या सर्व शेतमजुर/शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवणे इ. उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
४. हाताने काढणी करत असलेल्या कामगारांनी परस्परांमध्ये ४ ते ५ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी.त्याचबरोबर काढणी आणि वेचणी करताना तोंडाला मास्क लावावा आणि ठराविक वेळानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत.
५. जेवताना,विश्रांती घेताना,शेतमाल गाडीत चढवत असताना व उतरवत असताना दोन व्यक्तीमध्ये ४ ते ५फुट अंतर राहील याची दक्षता घेण्यात यावी. शेतामध्ये काम करताना कामगारांची जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
६. शेतात काढणी करत असताना अनोळखी व्यक्तीस प्रवेश देऊ नये.
७. शेतमालाची काढणी करण्यासाठी शक्य असल्यास यंत्रांचा वापर करण्यात यावा.तसेच यंत्र हाताळण्यासाठी आवश्यक कामगार उपस्थितीत राहतील असे पहावे.
८. काढणी यंत्रांचा वापर केल्यास यंत्रे, शेतमाल साठवून ठेवायच्या गोण्या व इतर साहित्य वापरण्यापूर्वी निर्जतुक करून घेणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर झाल्यानंतरही निर्जंतुक करून ठेवावे.
९. मका व भूईमूग पिकाची काढणी करताना सामायिक यंत्र असल्या कारणाने काढणी यंत्राची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून मगच काढणी करावी.
शेतमाल कापणी,साठवणूक व विपणन
१. श्वसनमार्गाचा संसर्ग, एरोसोल आणि धूळ कणांपासून बचाव करण्यासाठी काढणी, मळणी, सुकवणी, मालाची प्रतवारी करताना व पॅकेजिंग करताना सर्व शेतकरी/ कामगारांनी चेहऱ्याला मास्क लावणे आवश्यक आहे.
२. शेतात घरात कापणी केलेले धान्य, ज्वारी/बाजरी, डाळींच्या साठवण करण्याअगोदर योग्य वाळवून घ्या आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील हंगामात ज्या ज्यूट पिशव्याचा वापर केला आहे त्या पुन्हा वापर करू नका . पाच टक्के कडुनिंब द्रावणात साठवणुकीच्या पिशव्या निर्जंतुक करून घ्याव्यात.
३. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळेपर्यंत साठवणूक करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात ज्यूट पिशव्यांची उपलब्धता व त्याचबरोबर शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, शीतगृह व वेअर हाउसची सोय असावी.
४. शेतमालाची काढणी केल्यानंतर शेतमालाची हाताळणी, वाहतूक करताना तसेच प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत भाग घेताना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता व एकमेकांमध्ये ४.५ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
५. बियाणे उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी बियाणांचा पुरवठा बियाणे कंपनीला करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
६. टोमॅटो, कारली, हिरव्या पालेभाज्या, काकडी,कोबी आदी भाज्यांचे थेट विपणन/पुरवठा करताना सुद्धा वरील प्रमाणेच खबरदारी घ्यावी.
संसर्ग व प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना
खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यक व उपलब्ध बियाण्यांचा, सूक्ष्म मूलद्रव्ये,जैविक खते,सेंद्रीय खते यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध कृषि सेवा केंद्र, बियाणे व खते पुरवठा करणाऱ्या संस्था, बियाणे प्रमाणिकरण संस्था, वाहतूक करणाऱ्या यंत्रणा, संबधित अधिकारी व कर्मचारी यांना परवानगी पत्र /पास जिल्हाधिकारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत देण्यात यावे. कृषि क्षेत्रात विविध पातळीवर काम करणाऱ्या कामगार वर्गास, शेतकऱ्यांना तंत्रज्ञ, मदतनीस, वाहन चालक यांचे कोविड-१९ पासून संरक्षण करण्यासाठी घडिपत्रिका, पत्रके माहिती पुस्तिका याद्वारे प्रतिबंधात्मक उपायोजना व काळजी कशी घ्यावी यांची मोठ्याप्रमाणवर जनजागृती करण्यात यावी.खते, बियाणे व इतर कृषि साहित्य यांची वाहतूक इतर राज्यातून आपल्या राज्यात/जिल्ह्यात होत असेल तर संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी त्या साहित्याची पडताळणी करावी.
पिक कापणी प्रयोगासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी,शेतकरी यांना या कामासाठी परवानगी पत्र/पास देण्यात यावेत. पिक कापणी प्रयोगाची सर्व माहिती भरण्यासाठी मोबाईल अॅप वापरणे बंधनकारक आहे.
अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपतीमुळे शेतीचे,शेतमालाच्या नुकसानाची माहिती शासनास सादर करणे अनिवार्य राहील. शेतमाल काढणीनंतर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेत मालाची आवक-जावक करताना संबधित शेतकऱ्यांना, वाहन चालकांना, कामगारांना पास देण्यात यावा तसेच कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात यावी.