अकोला : जिल्ह्यात काल मंगळवारी पहिला रुग्ण आढळला असून, सलग दुसरा दिवशी चोवीस तास होत नाही तोच दुसरा रुग्ण आधळला असतानाच अकोलेकारांसाठी आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.
मंगळवारी स्थानिक बैदपुरा भागातील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर २४ तासांच्या आतच दुसरा रुग्ण आढळल्यामुळे अकोल्यावरील कोरोना संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आतातरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कोरोना संसर्गित रुग्ण ज्या भागातील आहेत तेथून तीन किमी परिसर परिघातील भाग सिलबंद होणार आहे. आता कोरोना विषाणू संसर्ग अकोला जिल्ह्यात आणि शहरातही पोहोचला आहे ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच थांबावे, बाहेर कुणाशीही संपर्क टाळावा, वारंवार हात धुवावे, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.