अकोला- संत गाडगेबाबांनी सांगितले होते ‘भुकेल्यांना अन्न द्या, रुग्णाला औषधोपचार द्या’. संत गाडगेबाबांची ही शिकवण प्रत्यक्ष अमलात आणल्याचा प्रत्यय हा अकोलेकरांनी दिला आहे. त्याला निमित्त ठरलेय ते कोरोना विषाणूचे संकट. या विषाणूने समाजातील विविध घटकांना हादरवले आहे. या परिस्थितीत समाजातील विविध घटक हे ज्यांच्या जेवणाची सोय नाही त्यांना अन्न पोहोचवून सेवाभावाचे अविरत यज्ञकर्म राबवित आहेत. अकोल्याच्या जिल्हा कारागृहात बंदिजनांच्या परिश्रमातून पिकलेला भाजीपाला या अशा अन्नछत्रांद्वारे गरजूंपर्यंत पोहोचविला जात आहे.
इतक्या मोठ्या संख्येने जनजीवन प्रभावित करणारी ही कोरोना संसर्गाची आपत्ती. या आपत्तीत सारे समाजघटक एकजुटीने काम करतांना दिसत आहे. भूक ही सगळ्यांची सारखीच असते. तिला जात धर्म नसतो. लॉक डाऊन मुळे कर्तव्यावर असणाऱ्यांना घराबाहेर रहावे लागतेय. काही जण आपल्या घरी न जाऊ शकल्याने अडकलेत. तर काहींना प्रशासनाने थांबवले आहे. अशा लोकांना किमान दोन वेळ जेवणाची सोय तर करायलाच हवी. प्रशासन ती करतंय. प्रशासनाच्या जोडीला विविध संस्था या कार्यात सहभागी झाल्यात. त्यासाठी जिल्ह्यात किमान २५ ठिकाणी आश्रय गृहे तर उघडण्यात आली आहेतच शिवाय तितकीच कम्युनिटी किचन ही सुरु करण्यात आली आहेत.
सेवाकार्य करणाऱ्या या कम्युनिटी किचन ला समाजातील दारशूर लोकांकडून अन्न धान्य, तेल इंधन, भाजीपाला या सारख्या आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. त्यासाठी तो कारागृहातूनही दिला जातोय. येथील जिल्हा कारागृहाकडे १४ एकर जमीन आहे. ही सर्व जमीन लागवडी खाली असून सिंचनासाठी तीन विहीरी आहेत. त्यात कारागृहातील बंदीजनांच्या परिश्रमातून इथं विविध प्रकारचा भाजीपाला पिकवला जातोय. हा भाजीपालाही या कम्युनिटी किचन मध्ये पोहोचविला जातोय. बाजारभावापेक्षा स्वस्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा भाजीपाला अन्न पदार्थ्याच्या रुपाने गरजूंपर्यंत पोहोचविला जात आहे.
कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव, ज्यांना घरेच नाहीत किंवा जे उघड्यावर राहतात असे गोरगरीब तसेच कोरोनामुळे इथं थांबावे लागलेले लोक असे सुमारे १५ ते २० हजार लोकांना हे अन्न पोहोचविले जाते. सकाळी पोहे, उपमा, शिरा, बटाटा वडा असे नाश्त्याचे पदार्थ, दुपारी व रात्री भाजी पोळी असे पोटभर जेवण दिले जात आहे. या शिवाय शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचे केंद्र चालकांनाही हा भाजीपाला देण्यात येत आहे. त्यामाध्यमातूनही गरजूंपर्यंत हा लाभ पोहोचविला जात आहे. संकटाचा हा काळ नक्कीच निघून जाईल, तो बऱ्यावाईट आठवणीही देऊन जाईल. पोटभर अन्न दिलं हि अकोलेकरांबद्दलची आठवण मात्र प्रत्येक आपत्तीग्रस्ताच्या हृदयात साठवली जाईल.