अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाचा तिसरा टप्पा भेदण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीत कोणीही व्यक्ती अन्न धान्य विना राहू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या टास्क फोर्सला दिल्या. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस,अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले,उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच टास्क फोर्स मधील सर्व अधिकारी उपस्थित होते.
गृहअलगीकरण आवश्यकच
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात जे जे व्यक्ती बाहेरगावाहून आले आहेत त्यांचे गृहअलगीकरण करणे आवश्यक आहे. त्या लोकांना घरातच राहणे आवश्यक आहे. हे लोक घराबाहेर फिरतांना आढळल्यास त्यांचेवर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.
गावपातळीवरील अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक दक्ष राहून कारवाई करावी व त्यांच्याकडे बाहेरगावाहून आलेल्या लोकांच्या गावनिहाय याद्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या आधारे ते लोक घरातच राहत असल्याची खात्री करावी. त्याच अनुषंगाने गावात व गावातून बाहेर कोणीही विना परवानगी ये जा करता कामा नये. ये जा करण्याची परवानगी केवळ अत्यावश्यक सेवांच्या अनुषंगानेच दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी ग्राम्स्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी अशा नागरिकांच्या घरी जाऊन ते घरातच असल्याची खातरजमा करावी. असे व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १९६० चे ४५ चे कलम १८८ नुसार कारवाई करावी,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ग्रामिण वा शहरी भागात परप्रांतातील अडकून पडलेल्या लोकांची माहिती गोळा करुन त्यांना आश्रयस्थान, वैद्यकीय तपासणी व जेवण, अंथरुण पांघरुण आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. जिल्ह्यात कोणीही व्यक्ती अन्न धान्य वा जेवणाशिवाय राहू नये यासाठीच्या खबरदारी घेण्याच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.
‘१०८’ रुग्णवाहिकांचा वापर करता येणार
जिल्ह्यातील दुरस्थ भागातील रुग्णांची वाहतूक व ने आण करण्यासाठी १०८ या रुग्णवाहिका सेवेचा वापर करता येणार आहे, असे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले .
शेतीकामांना अडथळा नाही
शेतकऱ्यांची मळणी वा अन्य स्वरुपाची कामे करण्यासाठी कोणतीही आडकाठी असणार नाही. त्यासाठी त्यांना गावातच कृषी सहाय्यकांमार्फत आवश्यक चार ते पाच मजूरांची उपलब्धता करुन दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे संत्रा, लिंबू, मोसंबी यासारख्या फळ पिकांच्या वाहतूकीसाठी वाहनांना पास हा कृषि विभागामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. त्याचप्रमाणे गावात पुरेसे पशुखाद्यही उपलब्ध ठेवावे लागेल, त्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांना घरपोच तांदूळ
शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ व अन्य जिनसा विद्यार्थ्यांना देण्यासाठी शाळेच्यास्तरावरुन नियोजन करण्यात यावे. हे धान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच करुन त्याच्या नोंदी ठेवाव्यात असे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे गावातील शाळेच्या शिक्षकांनी कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
किराणा माल, धान्य, गॅस पुरवठा सुरळीत
प्रत्येक गावात तसेच शहरात ठिकठिकाणी किराणा माल, धान्य, भाजीपाला तसेच गॅस यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टिने काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याचप्रमाणे त्या गावात जे जे लोक परप्रांतीय म्हणून आहेत त्यांना त्याच ठिकाणी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात यावी. त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी असेही त्यांनी सांगितले. शक्यतो मदत घेतांना ती वस्तू स्वरुपातच घ्यावी व लोकांना स्थानिक पातळीवरच द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कामगारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र सेल
या अभूतपुर्व परिस्थितीमुळे दररोज काम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या असंघटित मजूरांच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कामगारांना व असंघटीत क्षेत्रातील लोकांना मदत करणे, त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेणे, संबंधितांपर्यंत मदत पोहोचविणे याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने ७४४७२४१६८९ हे हेल्पलाईन नंबरही दिला आहे. या क्रमांकावर कामगार आपले प्रश्न समस्या सांगू शकतात.
क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश
या सर्व व्यवस्था गावपातळीवर राबविण्यासाठी क्षेत्रिय कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक असून गावात क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी हजर व्हावे असे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. जे क्षेत्रिय कर्मचारी गावातून परस्पर निघून गेले आहेत त्यांना नोटीसा बजावून त्यांचेवर संबंधित विभागप्रमुखांनी कारवाई करा, असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
गावपातळीवर औषध पुरवठ्याचे नियोजन
जिल्ह्याच्या ठिकाणी होलसेल औषध विक्रेत्यांची दुकाने आहेत. तेथे माल घेण्यासाठी गाव वा तालुका पातळीवर औषध विक्रीचे दुकान असणारे विक्रेते हे येत असतात. त्यांनी येथे येण्याची गरज नाही. दर दिवशी दोन तालुक्यातील औषध विक्रेत्यांना माल त्यांच्या गावात पोहोच केला जाईल, असा निर्णय आज केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार दर दिवशी दोन तालुक्यात जाऊन हे होलसेल विक्रेते आपला माल गावपातळीवरील दुकानदारांपर्यंत पोहोचवतील. त्यासाठी गाव पातळीवरील दुकानदारांनी आपली औषधींची मागणी दूरध्वनीवरुन संबंधित डिलरकडे नोंदवावी, त्याप्रमाणे माल पोहोचविला जाईल असे या बैठकीत ठरविण्यात आले अशी माहिती अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिले. झालेल्या नियोजनानुसार मंगळवार दि. ३१ रोजी बाळापूर, वाडेगाव व पातुर येथे माल पोहोच होईल तर बुधवार दि. १ एप्रिल रोजी तेल्हारा व हिवरखेड येथील विक्रेत्यांना माल पोहोच केला जाणार आहे.