अकोला(प्रतिनिधि)- विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी, एकमेकांसोबत किमान तीन फूट अंतर सोडून संवाद साधावा, अशा प्रशासनाकडून ‘सोशल डिस्टेन्सिंग’च्या सूचना आहेत. मात्र बाजारात किराणा अथवा भाजीपाल्यासाठीची गर्दी थांबत नसल्याचे चित्र दिसून आले. बाजारात दुकानदारांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान शहरासह गावागावात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकानात तुडंूब गर्दी होत आहे. सकाळी ८ वाजेनंतर नागरिकांनी भाजीपाला, फळे खरेदीकरिता गर्दी करित प्रशासनाच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या सूचनांना नागरिकांकडून बगल देण्यात येत आहे. दुकानदार केवळ व्यावसाय करण्यात मग्न आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होणार नाही, याचे कोणालाही घेणे-देणे नाही, असा नागरिकांचा मुक्त संचार होता. नागरिक एकत्रित येत असल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.