अकोला: शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीताचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अकोला जिल्हाप्रशासन अत्याधिक दक्ष झाले आहे. आता शेजारच्या जिल्ह्यातच कोरोना प्रादुर्भाव झाला आहे. निदान आता तरी अकोला जिल्ह्यातील रहिवाशांनी आपल्या घरातच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
आज बुलडाणा येथे एका कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नव्हता. तो स्थानिक रहिवासीच होता. याचा अर्थ आता कोरोना विषाणू प्रादुर्भावाची सामुहिक प्रसाराची स्थिती अर्थात टप्पा तीन आला आहे. त्यामुळे लोकांनी आता घरातच थांबणे अत्यंत गरजेचे आहे, असे या परिस्थितीची समूह वैद्यकीय पार्श्वभूमि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, या टप्प्यावर कोरोना विषाणू चा संसर्ग फैलावतो. त्यामुळे जे या संसर्गाला लवकर बळी पडू शकतात अशा घटकांतील लोकांनी उदा. गरोदर माता. लहान बालके, साठ वर्षा वरील वृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस कमकुवत असणारे लोक वा प्रतिकार शक्ती कमी असणारे लोक यांनी आवर्जून घरातच थांबणे आवश्यक आहे. वारंवार साबण लावून हात धुणे, कोणाच्याही संपर्कात न जाणे या सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या असून कोणिही कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सर्व वस्तूंची उपलब्धता जवळच करण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवाही उपलब्ध आहेत. लोकांनी केवळ घरातच रहावयाचे आहे. आपल्या कुटूंबातील वयोवृद्ध, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, श्वसन विकारांनी ग्रस्त लोक यांची काळजी घ्या, सावध रहा. घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
तिघांची तपासणी;अहवाल प्रलंबित दरम्यान,आज जिल्हा रुग्णालयात संशयित लक्षणांवरुन तिघे जण दाखल झाले, त्यांची तपासणी करुन घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले. त्यातील तिघांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२९ प्रवासी दाखल झाले असून ४४ जण हे गृह अलगीकरणात आहेत. तिघे हे विलगीकरणात व निरीक्षणात आहेत. तर ८२ जणांची गृह अलगीकरणाची मुदत पूर्ण झाली आहे.