अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजुर कामगारांची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे केली जात आहे. यात सेवाभावी संस्थांचे योगदान जिल्हा प्रशासनाला मिळत आहे. त्यात अकोला तालुक्यात २००, अकोट तालुक्यात १६०, बाळापुर येथे १०३, तेल्हारा १७ अशा एकूण ४८० मजूरांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. या मजूरांची निवास, जेवण व वैद्यकीय मदतीची (आवश्यकता भासल्यास) सुविधा प्रशासनातर्फे विनामूल्य उपलब्ध करुन दिली जात आहे. अकोला येथे रेल्वे प्रशासनाने रेल्वे कामावरील मजूरांची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी कंत्राटदार मजूरांच्या राहण्याची व्यवस्था करीत आहेत. बाळापूर तालुक्यात ट्रकमधून प्रवास करणारे मजूर होते त्यांचीही निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यात मनात्री येथील विटभट्टीवर काह मजुर आहेत. त्या विटभट्टीच्या मालकांनी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. जेथे जेथे असे मजूर असतील त्यांनी तात्काळ नजिकच्या तहसिलदार अथवा प्रांत कार्यालयात आपली नोंद करावी, त्यांची व्यवस्था करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्हा प्रशासनाला या कामात सेवाभावी संस्थांची व कंत्राटदार यांनी मदत होत आहे.